dahi handi 2025, Thane News ठाणे : गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा…’ असा जयघोष सध्या मुंबईसह, ठाणे आणि उपनगरांमध्ये पाहायला मिळत आहे. सर्वच ठिकाणी दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गोविंदा पथकांना आकर्षित करण्यासाठी मुंबई, ठाण्यात लाखो रुपयांचे पारितोषिकांची घोषणा केली आहे. त्यामुळे या दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चांगलीच चुरस रंगणार असल्याचे चित्र आहे. ठाणे शहरात टेंभी नाका, तलावपाळी, रघुनाथ नगर, वर्तकनगर, हिरानंदानी मेडॉस, नौपाडा आणि रेमंड याठिकाणी मोठ्या दहीहंडी पाहायला मिळतात. यंदाच्या वर्षी या दहीहंडीला लाखो रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आली आहेत.

ठाण्यात कुठे-कुठे मोठ्या दहीहंडी ?

रेमंडमधील दहीहंडी -‘गोविंदां’ची ‘पंढरी’ मानल्या जाणाऱ्या ठाणे शहरातील रेमंड रहिवाशी संकुलात यंदा प्रथमच ‘ढाक्कुमाकुम’चा सूर घुमणार आहे. `युवा स्टार प्रतिष्ठान’चे अध्यक्ष तुकाराम आंब्रे यांच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सव भरविण्यात येणार आहे. दहा थर रचणाऱ्या गोविंदा पथकाला ११ लाख रुपयांचे, तर रेमंड संकुलात सर्वप्रथम ९ थर रचणाऱ्या गोविंदा पथकाला ३ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. या उत्सवाचे अंध मुलांकडून रचली जाणारी पाच थरांची सलामी हे वैशिष्ट्य असेल. तर, सात थर रचणाऱ्या महिला पथकाला एक लाख ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. या दहीहंडी सोहळ्यात अभिनेत्री भाग्यश्री चिरमुले यांच्यासह विविध कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जाईल. तर स्थानिक ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, मुलांचा फॅशन शो आदी कार्यक्रमही आयोजित केले आहेत.

वर्तकनगर दहीहंडी- वर्तकनगर येथे प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही भव्य आयोजन करण्यात आले आहे. जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकास २५ लाखांचे बक्षीस आणि आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच सर्वात प्रथम ९ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास ११ लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे. यंदा या प्रतिष्ठानने दहीहंडीची थीम शोले चित्रपटाती ठेवली आहे. चित्रपटाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त या माध्यमातून चित्रपटाच्या कलाकारांना ट्रिब्यूट दिले जाणार आहे. या दहीहंडी उत्सवात १११ स्पॅनिश खेळाडू सहभागी होणार आहेत.

नौपाडा दहीहंडी – ठाण्यातील नौपाडा येथे मनसेचे अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांच्यावतीने दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात येतो. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राज्यभरात मराठीचा मुद्दा गाजत असताना मनसेने दहीहंडीसाठी एक सूचक पोस्टर प्रसारित केला आहे. अविनाश जाधव यांनी पोस्टर समाजमाध्यमांवर प्रसारित करुन त्यावर म…मराठीचा असा उल्लेख केला आहे. तसेच ‘मराठी सणांसाठी आणि मराठी मनांसाठी’ मनसे दहीहंडी असाही उल्लेख आहे. त्यामुळे यावर्षी मनसेच्या दहीहंडीकडे सर्वांचीच नजर असणार आहे.

हिरानंदानी मेडॉस दहीहंडी- भाजपचे शिवाजी पाटील (Shivaji Patil) यांनी स्वामी प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. टेंभी नाका दहीहंडी – धर्मवीर आनंद दिघे यांची हंडी म्हणून या दहीहंडी उत्सवाकडे पाहिले जाते. त्यामुळे टेंभीनाक्याची ही दहीहंडी मानाची हंडी म्हणून प्रसिद्ध आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्यानंतर विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी ही परंपरा कायम ठेवत या महोत्सवाला वेगळे वलय निर्माण करुन दिले. यंदाही ठाणे आणि मुंबईतील गोविंदा पथकांकरीता प्रत्येकी रोख बक्षीसे तसेच आकर्षक चषक देण्यात येणार आहेत.

तलावपाळी येथील दहीहंडी – तलावपाळी येथे शिवसेना (ठाकरे गट) नेते राजन विचारे (Rajan Vichare) यांच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते. रघुनाथनगर दहीहंडी – दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यातील रघुनाथ नगर येथे रवींद्र फाटक (Ravindra Phatak) यांनी संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सावाला अनेक बॉलिवूड कलाकार, मराठी सेलिब्रेटी हजेरी लावणार असल्याची चिन्हे आहेत.