ठाणे – सोमवारपासून ठाणे जिल्ह्यात पावसाने झोड घेतली असून जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले, तर नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत ठाणे जिल्ह्यात तब्बल १५९.१ मिमी सरासरी पावसाची नोंद झाली आहे. तर उल्हासनगर शहरात सर्वाधिक २२२.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
ठाणे जिल्हयात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तसेच ठाणे जिल्हयातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने तसेच अंबरनाथ तालुक्यातील उल्हास नदीने धोका पातळी ओलांडली आहे, जिल्हयातील बारवी, तानसा हे धरणे १००% क्षमतेने भरलेले असल्याने धरणाचे दरवाचे उघडलेले असून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तसेच आज २० ऑगस्ट रोजी सकाळी ११.०९ वाजता ३.९७ मी इतक्या उंचीची समुद्रास भरती येणार आहे याबाबींचा विचार करता ठाणे जिल्हयात अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
खाडी, नाले व नदीकाठच्या भागातील नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी नागरिकांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी ०२२-२५३०१७४०, ९३७२३३८८२७ किंवा १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, तालुकानिहाय पावसाचे चित्र पुढीलप्रमाणे आहे :- ठाणे १९६.९ मिमी, कल्याण १७२.६ मिमी, मुरबाड १२२.८ मिमी, भिवंडी १७९.६ मिमी, शहापूर १२६.७ मिमी, उल्हासनगर २२२.३ मिमी तर अंबरनाथ १४१.४ मिमी. या कालावधीत उल्हासनगर तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.