शहापूर : शहापूरची वाढती लोकसंख्या पाहता १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय अपुरे पडत असल्याचे समोर आले आहे. गंभीर रुग्णांना ठाणे येथे हलविण्यासाठी अंतर अधिक असल्याने रुग्णांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी तालुक्यात गंभीर रुग्णांसह गर्भवती महिला व लहान मुलांच्या रुग्णालयाची गरज आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असून शहापूरात २०० खाटांचे रुग्णालय आणि ‘ट्रॉमाकेअर’साठी शहापूर लगतच्या जलसंपदा विभागाची किंवा पर्यायी जागा शोधून एक महिन्यात शासनाला प्रस्ताव सादर करण्यात येईल अशी माहिती ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी शहापूरात दिली.

शहापूर तहसील कार्यालयात विविध योजनांचा आढावा घेतल्यानंतर जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी शहापुर उपजिल्हारुग्णालयाला आज भेट दिली. अतिदक्षता विभाग, बालरुग्ण विभाग, पुरुष व महिला कक्ष, शस्त्रक्रिया विभाग, डायलिसिस विभाग तसेच रुग्णांना देण्यात येणारी औषधालयातील विविध औषधांची तपासणी केली. खास करून लहान मुलांची औषधे बारकाईने तपासून मुदतबाह्य औषधांचा दर तीन महिन्यांनी आढावा घेण्याबाबत संबंधितांना सांगितले. गेल्या आठ महिन्यांपासून रुग्णालयात सुरू असलेल्या डीएनए मॉलिक्युलर लॅब बद्दल विचारणा केली असता काम सुरू असून लॅबमधील तज्ज्ञांची भरतीप्रक्रिया पूर्ण झाल्यावर संबंधित लॅब सुरू करण्यात येईल असे जिल्हा शल्यचिकित्सक कैलास पवार यांनी स्पष्ट केले.

त्यानंतर शहापुर लगत असलेल्या जलसंपदा विभागाच्या जागेची पाहणी करून संबंधित जमिनीचा प्रस्ताव सादर करण्याबाबत संबंधित विभागाला सूचना केल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी अमित सानप, तहसीलदार परमेश्वर कासुळे, वैद्यकीय अधीक्षक अशिलाक शिंदे, गजेंद्र पवार, निवासी नायब तहसीलदार वसंत चौधरी यांसह आरोग्य व तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, लोकप्रतिनिधींशी व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी चर्चा करून व जिल्हा नियोजन विभागाच्या माध्यमातून प्रस्ताव सादर करून शहापुर उपजिल्हारुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले. विविध महामार्ग, वाढती लोकसंख्या अपघातग्रस्त, गर्भवती महिला, लहान बालके या रुग्णांना आवश्यक असलेल्या अत्याधुनिक रुग्णालयासाठी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी प्रयत्न सुरू केल्याने तालुकवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.