ठाणे – जिल्ह्यासाठी हवामान विभागाने आज १९ ऑगस्टसाठी रेड अलर्ट जारी केला असून आज सकाळपासूनच जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर २० ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. अवघ्या चोवीस तासांच्या कालावधीत ठाणे जिल्ह्यात सरासरी तब्बल ११९.७ मिमी इतका पाऊस झाला आहे. तर यामध्ये ठाणे तालुक्यात सर्वाधिक असा १६६ मिमी पाऊस झाला झाला आहे. तर पावसाचा जोर अद्याप कायम असल्याने जिल्ह्यातील बचाव पथकांना विशेष सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांनी देखील गरज असल्यास तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर ठाणे आणि कल्याण येथे प्रत्येकी एक अशी एनडीआरएफची टीम तैनात करण्या आली आहे.
गेल्या दोन दिवसांपासूनच ठाण्यात पावसाचा जोर वाढलेला असून अनेक भागांत रस्त्यांवर पाणी साचणे, वाहतुकीत अडथळे, काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरणे अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार १८ ऑगस्ट रोजी दिवसभर ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळला असून अवघ्या एका दिवसात ११९.९७ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाल्याचे दिसून आले. तर याच पद्धतीने आज १९ ऑगस्ट रोजी सकाळपासूनच जोरदार पाऊस कोसळत आहे. तर संपूर्ण जिल्ह्याच्या तुलनेत ठाणे तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात येत आहे.
धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला
मागील दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे बारवी धरण पूर्ण भरले असून धरणाच्या आसपासच्या वस्त्यांना देखील सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला असून बारवी धरणातून २८.१४ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तर जिल्ह्यातील महत्वाची नदी असलेली उल्हास नदीने अद्याप इशारा पातळी ओलांडली नसली तरी याच पद्धतीने मुसळधार पाऊस राहिल्यास नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ होण्याची शक्यता आहे. याबाबत देखील जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना अवगत करण्यात आले आहे.