scorecardresearch

ठाणे जिल्हा तापला, जिल्ह्यात वर्षातील सर्वोच्च तापमानाची नोंद

डोंबिवली नजीकच्या पलावा परिसरात सर्वाधिक ४४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

बुधवारी ठाणे जिल्ह्यात यंदाच्या वर्षातील सर्वोच्च तापमानाची नोंद झाली. जिल्ह्याचे सरासरी तापमान हे ४३ अंश सेल्सिअस इतके होते. डोंबिवली नजीकच्या पलावा परिसरात सर्वाधिक ४४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर त्याखालोखाल भिवंडी, तळोजा, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि बदलापूर शहरात ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गेल्या तीन वर्षातील हे सर्वोच्च तापमान असल्याची माहिती खाजगी हवामान अभ्यासकांच्या कोकण हवामान या गटाने दिली आहे. त्यामुळे बुधवारी जिल्ह्यातील नागरिकांची अक्षरशः लाहीलाही झाली.

उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या आणि उष्ण वाऱ्यामुळे गेल्या काही दिवसात कोकण भागात तापमान मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यातच डोंगर आणि कातळ भाग असलेल्या परिसरात तापमान अधिक वेगाने वाढते. समुद्रकिनाऱ्यावरून येणाऱ्या वाऱ्यांना येण्यास उशीर झाल्यास तापमानात वाढ कायम राहते. दोन दिवसांपूर्वी समुद्रावरून येणारे वारे लवकर आल्याने तापमानात किंचित घट पाहायला मिळाली होती. बुधवारी मात्र समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांना उशीर झाल्याने ठाणे जिल्हा तापला. ठाणे जिल्ह्यातील सरासरी तापमान ४३ अंश सेल्सिअस इतके होते. जिल्ह्यातील डोंबिवली नजीकच्या काटई शीळ रस्त्यावर पलावा परिसरात खाजगी हवामान अभ्यासाने जिल्ह्यातील सर्वाधिक ४४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली. यंदाच्या वर्षातील उन्हाळ्यातील ही सर्वोच्च तापमानाची नोंद असल्याची माहिती खाजगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली आहे.

त्या खालोखाल जिल्ह्यात भिवंडी आणि तळोजा परिसरात सर्वाधिक ४३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कल्याण शहरात ४३.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. तर डोंबिवली आणि उल्हासनगर शहरात ४३.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बदलापूर शहर वर्षातील सर्वोच्च ४३.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल कोपरखैरणे आणि मुंब्रा येथे ४२.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. ठाणे शहरात मंगळवार पेक्षा कमी ४१.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. संपूर्ण जिल्ह्यात तापमान वाढलेले असल्याने दुपारी रस्ते ओस पडले होते. घरातील पंखे निष्प्रभ ठरले तर वातानुकूलित यंत्र नाही कमी पडल्याचा अनुभव बुधवारी येत होता. सांयकाळी पाच वाजेपर्यंत उष्णता जाणवत होती. विशेष म्हणजे ज्या भागात सिमेंट काँक्रीटचे आच्छादन सर्वाधिक आहे. अशा भागांमध्ये तापमान एक ते दोन अंश सेल्सियस अधिक असल्याचे जाणवत होते.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Thane district recorded the highest temperature of the year asj

ताज्या बातम्या