बारवी धरण ७५ टक्के भरल्याने वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा
बदलापूर : गेल्या दोन आठवडय़ांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ठाणे जिल्ह्य़ातील जवळपास सर्वच शहरांना पाणीपुरवठा करणारे बारवी धरण ७५ टक्क्यांपर्यंत भरले आहे. या धरणात सध्या २४७ दशलक्ष घनमीटर इतका मोठा पाणीसाठा असून धरणाची ७२ मीटरची उंची गाठण्यासाठी अवघे तीन मीटर शिल्लक राहिले आहेत. मागील २४ तासांपासून बारवी धरण क्षेत्रात चांगला पाऊस सुरू असल्याने हा टप्पाही लवकरच पूर्ण होईल, अशी माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील सूत्रांनी दिली. बारवीतील पाणीसाठय़ात झालेली वाढ आणि उल्हास नदीची वाढलेली पाणीपातळी यामुळे ठाणे जिल्ह्य़ाचा पाणीप्रश्न मिटल्यात जमा आहे.
गेल्या वर्षांत जुलै महिन्याच्या अखेरीस बारवी धरण भरून वाहू लागले होते. यंदाच्या वर्षांत ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपर्यंत हे धरण निम्मे रिकामे असल्याने चिंता व्यक्त केली जात होती. पावसाने मारलेली दडी पाहता ऐन पावसाळ्यात पाणीकपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने मुंबई महापालिकेने शहरात कपात केल्यानंतर ठाणे जिल्ह्य़ातही पाणीकपातीच्या चर्चाना उधाण आले होते. मात्र, गेल्या दोन आठवडय़ांपासून धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने ही चिंता मिटली आहे. बारवी धरणाची उंची गेल्या वर्षी वाढवल्याने यंदा अतिरिक्त पाणीसाठा होणार आहे. सध्याची बारवी धरणाची उंची ७२.६० मीटर असून सोमवारी पाणीसाठय़ाने ६९.१९ मीटरची पातळी गाठली होती. गेल्या आठवडाभरात धरणाच्या पाणीसाठय़ात जवळपास १७ टक्क्यांची भर पडली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास दोनेक दिवसांत धरण पूर्ण क्षमतेने भरेल, असा अंदाज आहे.
बारवी धरणातून ठाणे जिल्ह्य़ातील जवळपास सर्वच शहरांना पाण्याचा पुरवठा होत असतो. ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी तसेच नवी मुंबईतील ऐरोली, घणसोली यांसारख्या भागांत बारवी धरणातून पाण्याचा पुरवठा होत असतो. या सर्व परिसरांना नजीकच्या भविष्यात पाणीटंचाईतून दिलासा मिळाला आहे.
नदीकाठी दक्षतेच्या सूचना
बारवी धरणाचे दरवाजे स्वयंचलित असून धरणाने ७२.६० मीटरची उंची गाठल्यानंतर त्यातून आपोआप पाण्याचा विसर्ग सुरू होतो. त्यामुळे खबरदारी म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने बारवी नदीच्या प्रवाहाशेजारी आस्नेली, राहटोली, चोण, सागाव, पाटील पाडा, चांदप, पादिरपाडा, पिंपळोली, कारंद या नदीकाठच्या गावपाडय़ांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.