ठाणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संकल्पनेतील सांसद खेल महोत्सवाच्या धर्तीवर कल्याण लोकसभा मतदारसंघांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या खासदार क्रीडा संग्राम या स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा शुक्रवारी ठाणे येथे करण्यात आली. आयोजक खासदार डॉ . श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत आणि प्रसिद्ध फिरकीपटू हरभजन सिंग यांच्या हस्ते दुसऱ्या पर्वाची घोषणा करण्यात आली यावेळी खेळाडूंच्या सुरक्षेसाठी यंदापासून विमा दिला जाणार आहे तसेच खेळाडूंच्या शिक्षणासाठी अभिमाना दिला जाईल अशी घोषणा यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली.
कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून आयोजित खासदार क्रीडासंग्राम महोत्सवाचा भव्य शुभारंभ आज ठाण्यात मोठ्या उत्साहात पार पडला. यंदा या महोत्सवाचे दुसरे वर्ष असून १५ ते २३ नोव्हेंबर २०२५ दरम्यान अंबरनाथ, उल्हासनगर, दिवा, कळवा-खारेगाव, डोंबिवली, ठाणे आणि मुंब्रा या ठिकाणी या स्पर्धा रंगणार आहेत. यामध्ये सुमारे एक लाख खेळाडूंचा सहभाग अपेक्षित आहे. या उद्घाटन सोहळ्याला खासदार नरेश म्हस्के, भारताचे माजी क्रिकेटपटू आणि खासदार हरभजन सिंग, तसेच विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना खासदार डॉ. शिंदे म्हणाले, “खासदार क्रीडासंग्राम ही केवळ स्पर्धा नसून तरुणाईला योग्य दिशेने नेणारी एक प्रेरणादायी चळवळ आहे. इनडोअर, आऊटडोअर खेळांसोबतच यंदा पारंपरिक खेळांनाही विशेष स्थान देण्यात आले आहे. लेझीम, प्रो गोविंदा, ढोलताशा अशा स्पर्धांचा समावेश करून स्थानिक परंपरा आणि क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन दिले आहे.”
ते पुढे म्हणाले की, मागील वर्षी ३० हजारांहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता, तर यंदा तो आकडा एक लाखांपर्यंत पोहोचेल. क्रीडा व्यक्तिमत्त्व विकास, शिस्त, संघभावना आणि आत्मविश्वास वाढवतात, तसेच देशाच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका निभावतात, असेही त्यांनी सांगितले. यावेळी खेळाडूंना विमा आणि शिष्यवृत्ती देण्याची घोषणा त्यांनी केली.
क्रीडासंग्रामच्या स्पर्धांची माहिती घेण्यासाठी ९३३८५६७५६७ या क्रमांकावर मिस्ड कॉल केल्यास आवश्यक लिंक पाठवली जाईल, असे आयोजकांनी सांगितले.
खासदार क्रीडासंग्राम– ठळक वैशिष्ट्ये
- कालावधी: १५ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२५
- ठिकाणे: अंबरनाथ, उल्हासनगर, दिवा, कळवा-खारेगाव, डोंबिवली, ठाणे, मुंब्रा
- इनडोअर खेळ: बॅडमिंटन, टेबल टेनिस, कुस्ती, जिम्नॅस्टिक, बुद्धिबळ, बॉक्सिंग, रायफल शूटिंग, कॅरम
- आऊटडोअर खेळ: ऍथलेटिक्स, खो-खो, कबड्डी, फुटबॉल, मल्लखांब, व्हॉलीबॉल, आर्चरी, टग ऑफ वॉर
- पारंपरिक खेळ: पोहणे, हाफ मॅरेथॉन, अंडरआर्म क्रिकेट, बैलगाडा शर्यत