Maratha Morcha : ठाणे : ओबीसी समाजाचे कोणतेही आरक्षण कमी करून मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मराठा समाजाची देखील भूमिका नाही. मराठा समाजासाठी जे करता आले ते केले आहे. मराठा समाजासाठी जे योग्य, कायद्याच्या चौकटीत बसून देण्यासारखे आहे, ते देण्याची भूमिका आजही सरकारची आहे. भविष्यात सरकारला ज्या सूचना केल्या जातील. त्या सूचना लक्षात घेतल्या जातील. योग्य, कायदेशीर, नियमात बसणारी मागणी असेल तर याबाबत सरकार सकारात्मक आहे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शु्क्रवारी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी शिंदे बोलत होते. मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देणार असे जाहीर केले होते. त्यावेळी मी मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले. आजही मराठा समाजाला १० टक्के आरक्षणाचा लाभ मिळत आहे. कुणबी नोंदणी शोधण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांची समिती गठीत केली होती. ही समिती आज देखील काम करत आहे. लाखो कुणबी नोंदी सापडल्या. ‘सारथी’च्या माध्यमातून विविध उपक्रम सुरु केले. त्याचा देखील मराठा समाजाला लाभ मिळत आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून हजारो तरुणांना रोजगारासाठी बिनव्याजी कर्ज मिळते आहे असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
२०१६-२०१७ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाही मराठा समाजाला आरक्षण दिले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयात महाविकास आघाडीला बाजू मांडताना अपयश आले. महाविकास आघाडीला आरक्षणाकडे लक्ष देणे आवश्यक होते. दुर्दैवाने ते झाले नाही. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर १० टक्के आरक्षण दिले. ओबीसी समाजाचे कोणतेही आरक्षण कमी करून मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मराठा समाजाची देखील भूमिका नाही. मराठा समाजासाठी जे करता आले ते केले आहे. मराठा समाजासाठी जे योग्य, कायद्याच्या चौकटीत बसून देण्यासारखे आहे, ते देण्याची भूमिका आजही आहे. मराठा समाज आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात मागासलेला असल्यानेच हे आरक्षण देण्यात आले होते. भविष्यात सरकारला ज्या सूचना केल्या जातील. त्या सूचना लक्षात घेतल्या जातील. योग्य, कायदेशीर, नियमात बसणारी मागणी असेल. याबाबत सरकार सकारात्मक आहे.
महाविकास आघाडी अपयशी
आमचे सरकार सर्वसामान्यांचे आहे. जे आता टीका करत आहेत, त्यांना आरक्षण टिकविता आले नाही. त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट करायला हवी. ते लोक बाहेर खूप काही बोलतात. परंतु बैठक घेतल्यावर येत नव्हते. महायुतीने दिलेले आरक्षण ते मुख्यमंत्री असताना टिकवू शकले नाही अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. मराठा समाजाबद्दल किती दुटप्पी भूमिका आहे. मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी ते अपयश ठरले आहेत असाही आरोप त्यांनी केला.