Malegaon blast case: ठाणे : “भगवा आतंकवाद” किंवा “दहशतवाद” असे आरोप करणाऱ्यांनी हिंदुत्वाचा अपमान केला असून, या गंभीर आरोपांमागे तत्कालीन काँग्रेस सरकारचे कट कारस्थान होते, असा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला. मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणात तपास यंत्रणेवर दबाव टाकणाऱ्यांची चौकशी आणि नार्को टेस्ट झाली पाहिजे, अशी मागणी करत त्यातून दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि यातून तत्कालीन काँग्रेस सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर येईल, असेही ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दुपारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना तत्कालीन काँग्रेस सरकारवर निशाणा साधला.

मालेगाव प्रकरणांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव घेण्यासाठी छळ केला होता, असा जबाब यापूर्वी एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने दिला आहे, ही दुदैवी बाब आहे. साध्वी प्रज्ञा सिंग यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचेही नाव घ्यावे, यासाठी त्यांचा छळ केला होता. त्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास दिला, हे अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे, असे शिंदे म्हणाले. तत्कालीन काँग्रेस सरकार हे हिंदुत्वाच्या विरोधात होते आणि हिंदुत्वाचा अपमान करणारे होते. केवळ मतांच्या राजकारणासाठी कुठल्या थराला ते जाऊ शकतात, याचे हे मूर्तीमंत उदाहरण आहे, असेही शिंदे म्हणाले.

काँग्रेस सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर येईल

तत्कालीन राज्यकर्ते म्हणत होते की, दहशतवादाला कुठलाही रंग नसतो, कुठलाही धर्म नसतो पण, याच लोकांनी मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणात म्हटले होते की, हा भगवा आतंकवाद आणि भगवा दहशतवाद आहे. तसेच बाॅम्बस्फोटाच्या खोट्या केसेसमध्ये मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या कट्टर देशभक्तांचे नाव घेऊन खोटे आरोप करत भगवा दहशतवाद सिद्ध करण्याचे कारस्थान तत्कालीन काँग्रेस सरकारने रचले होते, असा आरोप करत या लोकांनी हिंदू धर्मियांची माफी मागितली पाहिजे, असेही ते म्हणाले.

अशा प्रकारचे दुर्दैवी राजकारण कधीही झाले नव्हते. त्यामुळे तपास यंत्रणेवर दबाव टाकणाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, त्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. जेणेकरून दूध का दूध पाणी का पाणी झाली होईल आणि यातून तत्कालीन काँग्रेस सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर येईल, असेही ते म्हणाले.

त्याची किंमत चुकवावी लागेल

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना हीच काँग्रेसची नीती आहे. त्यावेळी झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणावरून महाराष्ट्र आणि देशाचे लक्ष विचलित करण्यासाठी हे कारस्थान रचले होते. त्यामुळे तत्कालीन काँग्रेस सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आला पाहिजे. त्यांचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. हिंदुत्व, हिंदू धर्म, सनातन धर्म कोणावरही कधीही अन्याय करत नाही. तो सहिष्णू आहे. सहन करणार आहे. परंतु हिंदुत्व आणि सनातन धर्मावर आरोप होतील, तेव्हा त्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल, असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरेंवर टिका

आम्ही हिंदुत्व सोडले नाही असे म्हणणारे कुठे गेले. एवढ्या मोठ्या घटनेवर एकही शब्द काढत नाही, हे कसले हिंदूत्व आहे. राहुल गांधी नेहमी सावरकरांचा अपमान करतात, हिंदुत्वाचा अपमान करतात, ऑपरेशन सिंदूरचा ही अपमान केला. त्यांच्या मांडीला मांडी लागून बसतात, हे कसले हिंदुत्व आहे. याचा विचार आता जनता केल्याशिवाय राहणार नाही, अशी टिका शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. तसेच बाळासाहेबांचे हिंदुत्व आम्ही पुढे घेऊन चाललो आहोत, असे शिंदे म्हणाले.