Ravindra Verma Arrested spying for Pakistani intelligence : मुंबईतील नौदलाच्या प्रतिबंधित क्षेत्राबाबत महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपाखाली रवी वर्मा (२७) या अभियंत्याला महाराष्ट्र राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे. समाज माध्यमावर तरुणीच्या प्रोफाईलद्वारे रवीला पाकिस्तानी गुप्तहेरांनी जाळ्यात ओढल्याचा संशय आहे. कामानिमित्त त्याचं मुंबई नौदल गोदीत जाणं येणं चालू होतं. त्यामुळे त्याच्याकडे गोदीची माहिती व नकाशे होते जे त्याने पाकिस्तानी गुप्तहेरांना दिल्याच्या त्याच्यावर आरोप आहे.
दरम्यान, रवी वर्माच्या आईने म्हटलं आहे की “माझ्या मुलाने काहीच केलेलं नाही. त्याने मला सांगितलंय की तो फेसबूक बंद करणार आहे. तो निर्दोष आहे. पोलिसांनी त्याला सोडून द्यावं”.
“पोलीस दिवसभर माझ्या मुलाची चौकशी करतायत, पण कसली चौकशी ते सांगत नाहीत”
रवी वर्माची आई रेखा वर्मा यांनी काही वेळापूर्वी एबीपी न्यूजशी बातचीत केली. यावेळी त्या म्हणाल्या, “सुरुवातीला माझ्या मुलाला चौकशीसाठी नेलं तेव्हा मला सांगण्यात आलं होतं की पासपोर्टशी संबंधित कामानिमित्त ते त्याला घेऊन जात आहोत. पाठोपाठ माझा भाऊ तिकडे गेला, मग माझी बहीणही गेली. त्यांनी माझ्या मुलाला दिवसभर थांबवलं. चौकशी करत आहेत असं सांगण्यात आलं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत पोलीस त्याचा जबाब नोंदवत होते. नेमकी कसली चौकशी चालू आहे ते आम्हाला सांगण्यात आलं नाही”.
माझा मुलगा निर्दोष : रेखा वर्मा
रेखा वर्मा म्हणाल्या, “माझ्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यापासून माझं त्याच्याशी काहीही बोलणं झालेलं नाही. त्याने मला फक्त एवढंच सांगितलंय की आई मी फेसबूक बंद करेन. सुरुवातीला पासपोर्टचं कारण सांगून पोलिसांनी त्याला नेलं होतं. मात्र नंतर दहशतवादविरोधी पथकाने (एटीएसने) त्याला ताब्यात घेतलंय हे समजल्यापासून भिती वाटू लागली आहे. माझ्या मुलाने काहीच केलेलं नाही. तो निर्दोष आहे”.
रवी वर्माची आई म्हणाली, “मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, आमचं बोलणं झालं नाही. तो म्हणाला, आई हे पाकिस्तानवाले लोक… तो पुढे काही बोलायच्या आधी मी त्याला म्हटलं तू पहिल्यांदा ते काम सोडून दे. त्यानंतर माझं लेकरू मला न्यायालयात दिसलं. त्याच्या हातात बेड्या होत्या. मला त्याला भेटायचं होतं, परंतु पोलिसांनी भेटू दिलं नाही, बोलू दिलं नाही. माझ्या मुलाने काहीच केलेलं नाही”.