ठाणे : गेल्या आठवड्यात भातसा धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पाणी उपसा केंद्राजवळील नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा, आणि झाडांच्या फांद्या जमा झाल्या होत्या. यामुळे शहरातील पाणी पुरवठ्यात ३० टक्के कपात झाल्याने शहरात टंचाईची समस्या निर्माण झाली होती. ही समस्या दूर झाली असली तरी मुंबई महापालिकेच्या पाणी उपसा केंद्रातील गेटमुळे नदी पात्रातील पाणी पातळी खाली गेल्याने पालिकेला पुरेशा पाण्याचा उपसा करणे शक्य होत नसल्याने गणेशोत्सवात टंचाईची समस्या निर्माण झाली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २७ लाख इतकी आहे. शहरासाठी प्रतिदिन ६२१ दशलक्षलीटर इतक्या पाण्याची गरज आहे. परंतु शहराला प्रत्यक्षात दररोज ५९० दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्ष लीटर, स्टेम कंपनीकडून ११५ दशलक्ष लीटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ९० दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. वाढत्या लोकवस्तीमुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. शहराला अजून ३२ दशलक्षलीटर इतक्या वाढीव पाण्याची गरज आहे. असे असतानाच, शहरातील पाणी पुरवठ्याचा महत्वाचा स्त्रोत असलेल्या महापालिकेच्या योजनेतील पाणी पुरवठ्यात दहा ते पंधरा टक्के कपात झाल्याने शहरात टंचाईची समस्या निर्माण होत आहे.

ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा शहराच्या विविध भागात करते. त्यामुळे शहरातील हा पाण्याचा महत्वाचा स्रोत मानला जातो. या पाणीपुरवठा योजनेसाठी महापालिका भातसा नदीच्या पात्रावरील पिसे बंधाऱ्यातुन पाणी उचलते आणि त्याचा शहरात पुरवठा करते. भातसा धरण क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पाणी उपसा केंद्राजवळील नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा, आणि झाडांच्या फांद्या जमा झाल्या आहेत.

नदीपात्रात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन पाणी उपसा केंद्रामध्ये पाणी शिरल्यामुळे पूर्ण क्षमतेने पाणी उपसा करणे शक्य होत नव्हते. तसेच, गढूळपणामुळे शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवर परिणाम होत होता. यामुळे शहरातील पाणी पुरवठ्यात २५ ते ३० टक्के कपात झाली आहे. पालिकेने गाळ, कचरा काढून साफसफाईचे काम केले. यानंतर पाणी पुरवठा सुरळीत होणे अपेक्षित होते. परंतु याच नदी पत्रात असलेल्या मुंबई महापालिकेच्या पाणी उपसा केंद्रातील गेटमुळे नदीतील पाणी पातळी खाली गेल्याने पालिकेने पुरेसे पाणी उपसा करणे शक्य होत नसून यामुळे शहरात टंचाईची समस्या निर्माण झाली आहे.