ठाणे – वागळे इस्टेट भागातील सीपी तलाव परिसरात असलेल्या पालिकेच्या या कचरा हस्तांतरण केंद्रावरील कचऱ्याला मोठ्या प्रमाणात आग लागल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतू, या आगीच्या धुराचे लोट परिसरात पसरल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना तसेच याभागात असलेल्या कंपनीमधील कर्मचाऱ्यांना याचा खूप त्रास झाल्याची माहिती समोर आली आहे.

वागळे इस्टेट भागातील सीपी तलाव परिसरात पालिकेच्या या कचरा हस्तांतरण केंद्रावर शहरातील विविध भागातील कचऱ्याचे संकलन करुन त्याचे वर्गीकरण केले जाते. त्यामुळे याठिकाणी दररोज कचऱ्याचे ढीग लावले जातात. या कचरा हस्तांतरण केंद्राजवळ लोकवस्ती, मोठमोठे गृहसंकुले तसेच औद्योगिक कंपन्या आहेत. कचरा हस्तांतरण केंद्रामुळे परिसरात पसरलेल्या दुर्गंधी आणि घाणीच्या साम्राज्यामुळे स्थानिक नागरिकांकडून हे कचरा हस्तांतरण केंद्र याठिकाणाहून हटविण्यासाठी वारंवार मागणी केली जात आहे. या कचरा हस्तांतरण केंद्रावरील कचऱ्याला शुक्रवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास आग लागली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याची माहिती स्थानिक रहिवाशांनी ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली. माहिती मिळताच, सहाय्यक आयुक्त सुनील मोरे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी, अग्निशमन अधिकारी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आग मोठ्या प्रमाणात पसरल्यामुळे ती विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु होते. परंतु, आगीच्या धुराचे लोट आजूबाजूच्या परिसरात पसरल्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर ही आग अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान यांच्या मदतीने ७ वाजताच्या सुमारास पूर्णपणे विझविण्यात आली.