ठाणे : ठाणे जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थामधील सदस्यांचे प्रश्न, समस्या, शंका-कुशंका सोडविण्याकरिता ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनच्यामार्फत आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने ठाण्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ‘दाद – फिर्याद’ या जनसंवाद उपक्रमाला गृहनिर्माण संस्थांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात सोसायट्यामधील सदस्य आणि कमिटीमधील वाद तसेच प्रश्नांवर तोडगा काढण्यात ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनला यश आले आहे.

कमिटी सोबतचे वाद-विवाद यांचे निवारण किंवा तोडगा काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी ‘दाद फिर्याद’ हा अभिनव उपक्रम ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनने सुरू केला आहे. जुलै महिन्यातील ‘दाद फिर्याद’ या उपक्रमाचे शनिवारी ठाण्यातील लोहार आळी जवळील बोरवणकर सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन कोकण विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव, जिल्हा उपनिबंधक डॉ.किशोर मांडे, ठाणे उपनिबंधक अविनाश भागवत यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी, ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, नवी मुंबई हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष भास्कर म्हात्रे, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे संचालक मंडळ व कर्मचारीवृंद आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमाला शेकडो रहिवाश्यांची उपस्थिती होती. सहनिबंधक भालेराव, फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, उपनिबंधक डॉ. मांडे आणि भागवत यांनी तक्रारदारांच्या प्रश्नांना विधीसुलभ उत्तरे देऊन सहकार कायदा आणि उपविधीविषयी तक्रारदारांचे प्रबोधन करताना बहुसंख्य समस्यांचे निराकरण केले.

दरम्यान, ‘दाद-फिर्याद’ उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना, विभागीय सहनिबंधक भालेराव यांनी, सदस्यांच्या तक्रारी ‘दाद- फिर्याद’ सारख्या व्यासपीठावर मांडण्याआधी गृहनिर्माण संस्थांनी सोसायटीमध्येच आपापल्या स्थरावर अशा प्रकारे जनसंवाद उपक्रम राबविल्यास निम्याहून अधिक समस्या, शंका – कुशंका जागीच मिटण्यास मदत होऊ शकेल, अशी सूचना करून ग्रामीण क्षेत्रात सहकाराची त्रिस्तरीय संरचना असते. त्या धर्तीवर शहरीकरणात सहकारी गृहनिर्माण संस्था गरजेच्या असल्याचे आवर्जून नमुद केले. तर, डॉ. मांडे यांनी, “दाद-फिर्याद” सारख्या उपक्रमाद्वारे समुपदेशातून प्रश्न सुटणे हे अभिप्रेत असुन विशेषतः अशा प्रकारच्या जनसंवादामधून तंटामुक्तीला प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे सांगितले. सोसायट्यांनी मानले हाऊसिंग फेडरेशनचे आभार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाणे जिल्ह्यात हजारो सहकारी गृहनिर्माण सोसायटया असुन त्यांचे असंख्य प्रश्न आणि समस्या आहेत. या सोसायट्यामधील सदस्य आणि कमिटीमधील वाद आणि प्रश्नावर “दाद-फिर्याद” सारख्या उपक्रमातुन सुलभ तोडगा सुचवुन संवाद घडवल्याबद्दल उपस्थित सोसायटी सदस्य व पदाधिकाऱ्यांनी ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांचे आभार मानले.