ठाणे : मुंब्रा येथील डोंगरात शुक्रवारी सायंकाळी वाट चुकल्याने अडकलेल्या पाच मुलांची ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागासह मदत यंत्रणांनी सुखरुप सुटका करत त्यांना पालकांच्या ताब्यात दिले. ही मुले डोंगरात खेकडे पकडण्यासाठी गेली होती पण, तेथून परतत असताना ते वाट चुकल्याने सात तास डोंगरात अडकले होते.

असहदुल पिंटू शेख (१२), मोहम्मद पिंटू शेख (११), ईशान पिंटू शेख (१०), मुन्ना अमन शेख (०९) आणि अमीर बाबू शेख (११) अशी डोंगरातून सुटका झालेल्या पाच मुलांची नावे आहेत. यातील असहदुल, मोहम्मद आणि मुन्ना हे तिघे मुंब्य्रातील दर्गा गल्ली परिसरात राहतात. ईशान हा मुंब्य्रातील आझाद नगर तर अमीर हा कौसा पेट्रोल पंप जवळ राहतो. हे पाचजण शुक्रवारी सकाळी एका तरुणासोबत मुंब्रा येथील डोंगरात खेकडे पकडण्यासाठी गेले होते.

हेही वाचा…कोलशेत खाडी भरावाप्रकरणाची होणार चौकशी; वनमंत्र्यांच्या आदेशामुळे अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डोंगरावर तीनशे फुट उंच गेल्यानंतर ते खेकडे पकडू लागले. याचदरम्यान, त्यांच्यासोबत असलेला तरुण महत्वाचे काम असल्याचे सांगून त्यांना तिथेच सोडून निघून गेला. अंधार पडण्याआधी ही मुले डोंगरावरून खाली उतरू लागली. परंतु ते वाट चुकल्याने डोंगरात अडकले. तेथूनच ते मदतीसाठी आवाज देऊ लागले. दरम्यान, या डोंगराच्या पायथ्याशी एक दर्गा आहे. जंगलातील शांततेमुळे मुलांच्या मदतीचा आवाज दर्ग्यापर्यंत येत होता. यानंतर दर्ग्यातील नागरिकांनी माहिती देताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन जवानांनी शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजल्यापासून या मुलांचे शोधकार्य सुरु होते. त्यापाठोपाठ ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभाग, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक, गिर्यारोहकांच्या पथक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मुलांचा शोध सुरू केला. अखेर पहाटे ३ वाजता पथकाने मुलांचा शोध घेऊन त्यांची सुखरुप सुटका करत त्यांना पालकांच्या ताब्यात दिले.