ठाणे– शहरातील राम गणेश गडकरी रंगायतनच्या नव्या रुपाचे ठाणे महापालिका आणि ठाणेकर रसिकांनी जल्लोषात स्वागत केले. ढोलताशांच्या गजरात हा स्वागत सोहळा पार पडला. गडकरी रंगायतनची आतील आणि बाहेरील बाजू विविध रंगांच्या फुलांच्या माळांनी सुंदरपणे सजवण्यात आली होती. ठाणेकर रसिक गडकरी रंगायतनचे हे नवे रूप आपल्या कॅमेरात कैद करताना दिसून आले. दहा महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर अखेर शुक्रवारी गडकरी रंगायतनची तिसरी घंटा वाजली आणि पडदा खुला झाला यावेळी रसिक प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण होते.

राम गणेश गडकरी रंगायतन हे ठाणेकरांचे सांस्कृतिक केंद्रबिंदू आहे. १९७८ मध्ये या नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली आहे. १९९८ नंतर आता २६ वर्षांनी या नाट्यगृहाचे नुतनीकरण करण्यात आले आहे. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली, रंगायतनच्या जुन्या झालेल्या वास्तूला बळकटी देऊन सर्व यंत्रणांचे नुतनीकरण करण्यात आले आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये नुतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. हे काम सुरू करताना आणि कामाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर रंगभूमीवर कार्यरत असलेले कलाकार, दिग्दर्शक, निर्माते यांच्याशी महापालिकेने सविस्तर चर्चा आणि प्रत्यक्ष पाहणीही केली होती. त्यानुसार, गडकरी रंगायतनचे संपूर्ण रुप पालटून टाकण्यात आले आहे.

अखेर दहा महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर शुक्रवारी गडकरी रंगायतन ठाणेकर रसिकांसाठी खुले झाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गडकरी रंगायतनचे लोकार्पण करण्यात आले. गडकरी रंगायतनच्या लोकार्पण निमित्त फोकलोक या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला रसिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

अशी आहे गडकरी रंगायतनची नवीन रचना

रंगायतनच्या इमारतीवर डाव्या बाजूला मोठ्या सोनेरी रंगाने ‘राम गणेश गडकरी रंगायत’असे सुरेख अक्षरात लिहीले असून हे रंगायतनचे नवे आकर्षण ठरले आहे. नाट्यगृहातील आसनव्यवस्था नविन बसविण्यात आली आहे. याठिकाणी पूर्वी १ हजार ५० खुर्च्या होत्या. परंतू, नुतनीकरणा दरम्यान ८५० ऐसपैस खुर्च्या बसविण्यात आल्या आहेत. यामुळे आसनव्यवस्थेत २०० खुर्च्यांची घट झाली आहे.

या नाट्यगृहामध्ये ज्येष्ठ नागरिक येण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. परंतू, त्यांना जीने चढावे लागत असल्यामुळे त्यांची दमछाक होत होती.त्यामुळे रंगायतनमध्ये आता उद्वाहक (लिफ्ट) बसविण्यात आली आहे. तसेच संपूर्ण रंगरंगोटी, नवीन दरवाजे- खिडक्या, नवीन गालीचा यासह एक स्तनपान कक्ष देखील तयार करण्यात आला आहे. इमारतीच्या बांधकामाची संपूर्ण दुरुस्ती करण्यात आली आहे. सुशोभीकरण, नवीन सुरक्षा केबिन, रंगमंचावरील विद्युत दिवे आणि ध्वनी यंत्रणा, नवीन वातानुकूलित यंत्रणा अशी कामे या निधीतून करण्यात आली आहेत.

जुना पडद्यासारखाच पडदा बनवावा

राम गणेश गडकरी रंगायतनमधील पडदा जीर्ण झाल्याने तो बदलून नवीन पडदा बसविण्यात आला आहे. मात्र, नवीन पडद्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमात बोलताना आक्षेप घेतला. जुना पडदा हा गडकरी रंगायतन नाट्यगृहाची शान होती. त्यामुळे ज्यांनी कोणी जुना पडदा बनविला होता. त्यांच्याकडून पुन्हा तसाच पडदा बनवून घ्यावा अशी सुचना त्यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना केली. या पडद्यावरुन काही रसिकांनी देखील नाराजी व्यक्त केली.