ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. सहा फुटापेक्षा कमी उंचीच्या गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात येते तर, मोठ्या मूर्तीचे विसर्जन खाडीत करण्यात येते. त्यासाठी येथे बार्ज आणि कर्मचारी तैनात करण्यात येतात. त्यासाठी ठाणे महापालिकेकडून आर्थिक तरतूद करण्यात येते. मात्र, या आर्थिक खर्चावरून ठाण्यातील गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांनी महापालिका आणि पोलिसांसोबत झालेल्या बैठकीत गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून विविध देखावे उभारून सामाजिक संदेश देण्यात येतो. ठाणे शहरात गणेश मुर्ती विसर्जनामुळे तलावांचे पाणी प्रदुषित होऊ नये यासाठी कृत्रिम तलाव तयार करण्यात येतात. मोठ्या मूर्तीचे विसर्जन खाडीत करण्यात येते. हा उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी ठाणे महापालिका दरवर्षी गणेशोत्सवाआधी सार्वजनिक मंडळाच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन त्यांची समस्या जाणून घेते. यंदाही ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव ( Saurabh Rao ) यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी अशीच एक बैठक पार पडली. या बैठकीस गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी, विक्रेते, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, पोलिस उपायुक्त प्रशांत कदम, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट, महापालिका उपायुक्त मनीष जोशी, शंकर पाटोळे, मधुकर बोडके, दिनेश तायडे, सचिन सांगळे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांच्यासह महापालिका, महावितरण, टोरॅंट पॉवर, स्वंयसेवी संस्था यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
हरित विसर्जन ॲप
पर्यावरणपूरक उत्सव साजरे करण्यासाठी उच्च न्यायालयाचे आदेश, त्याअनुषंगाने राज्य शासनाने जाहीर केलेली कार्यपद्धती याची सविस्तर माहिती सादरीकरणाद्वारे मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली. तसेच, ठाणे महापालिकेने संपूर्ण विसर्जन व्यवस्थेची माहिती देणारे हरित विसर्जन ॲप तयार केले आहे. ते लवकरच नागरिकांसाठी सर्व मोबाईल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार असल्याचेही प्रधान यांनी सांगितले. या बैठकीत, मंडळांच्या वतीने विसर्जन व्यवस्थेबाबत ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीचे उपाध्यक्ष रवींद्र पालवे, उल्हास बर्डे, विनायक सुर्वे, वासुदेव अलगुज, विकी चॅको, विशाल महाडिक आदींनी विविध मुद्दे मांडले.
मंडळांनी केली ही मागणी
गणेश मूर्तीची मंडळाचे सदस्य मनोभावे पूजा करतात. पण, विसर्जन ठिकाणी क्रेनची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या मूर्ती खाडीच्या पाण्यात बार्जवरून खाली ढकलून द्यावी लागते. त्यामुळे मंडळांच्या प्रतिनिधींना काहीसे वाईट वाटते. त्यामुळे यंदा विसर्जन घाटांवर क्रेनची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. क्रेनसाठी दोन हजार रुपये प्रती तास भाडे आकारले जात असून हा खर्च पालिकेसाठी मोठा नाही, अशी मागणी ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीचे उपाध्यक्ष रवींद्र पालवे यांनी बैठकीत केली.
शंभर रुपयांचे बजेट पण..,
गणेश मूर्ती विसर्जन व्यवस्था निर्माण करण्यासाठी ठाणे महापालिकेकडून आर्थिक तरतूद करण्यात येते पण, ती कमीच पडत असल्याचे दिसून येते. त्याठिकाणी कामासाठी नेमलेले ठेकेदार आम्हाला सांगतात की, पालिकेने शंभर रुपयांचे बजेट मंजूर केले तर त्यातील २० रुपये आम्हाला मिळतात. परिणामी विसर्जन व्यवस्थेत त्रुटी राहतात आणि त्याचा फटका गणेश विसर्जनाला बसतो. अनेकदा रात्री उशिरा गणेश मूर्ती विसर्जनासाठी येतात, त्यावेळी तिथे कर्मचारी उपलब्ध नसल्याने मंडळांच्या सदस्यांना मूर्तीचे विसर्जन करावे लागते, असे आरोप ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीचे उपाध्यक्ष रवींद्र पालवे यांनी करत त्यात सुधारणा करण्याची सूचना बैठकीत केली.
दोन सत्रात स्वतंत्र मनुष्यबळ
विसर्जनाच्या ठिकाणी मनुष्यबळ वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. ती लक्षात घेऊन मनुष्यबळ वाढवण्यात येईल. तसेच, दोन सत्रात मनुष्यबळाची व्यवस्था करण्यात येईल. त्यामुळे कार्यक्षमतेत सुधारणा होईल, असा विश्वास आयु्क्त राव यांनी व्यक्त केला. घाट विसर्जनस्थळी क्रेन आणि वाढीव बार्ज असावेत, अशी सूचना गणेशोत्सव समन्वय समिती आणि पोलिसांनी केली आहे. त्याबाबत विचार करण्याचे आश्वासनही आयुक्त राव यांनी दिले.