Ganeshotsav 2025 Thane ठाणे – सर्वत्र गणेशोत्सवाची धुम सरु आहे. वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात बुधवारी गणपतीचे आगमन झाले. गणपतीच्या स्वागतासाठी ठाणे शहरातील घरगुती आणि सार्वजनिक मंडळांनी जल्लोषात तयारी केल्याचे दिसत आहे. मुंबईप्रमाणे ठाणे शहरात देखील काही मंडळे अशी आहेत की, त्यांच्या संस्कृती, परंपरा देखावे आणि सामाजिक उपक्रमांमुळे ती मंडळे प्रसिद्ध आहेत. गणेशोत्सवाच्या काळात ठाण्यातील या मंडळांना तुम्ही नक्की भेट देऊ शकतात.

गणेशोत्सवाच्या काळात मुंबई अनेक मंडळांमध्ये मोठमोठ्या उंचीच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना होते आणि हे मुंबईच्या गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण आहे. त्यामुळे मुंबईतील गणपती दर्शनासाठी ठाणे जिल्ह्यातून तसेच विविध भागातून नागरिक मुंबईत जात असतात. परंतू, प्रत्येकालाच मुंबईत गणेशोत्सवासाठी जाणे शक्य होत नाही. अशा गणेशभक्तांसाठी ठाणे शहरात देखील असे काही मंडळे आहेत की जिथे मोठमोठ्या उंचीच्या मूर्ती आणि आणि सुरेख अशा देखाव्यांमुळे या मंडळांचा नावलौकिक आहे. या मंडळांना भेट दिल्यावर तुम्हाला प्रसन्न तर वाटेलच शिवाय तुम्हाला गणपतीचे दर्शन देखील उत्तम मिळेल.

हे आहेत ठाण्यातील प्रसिद्ध मंडळ

१) नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

१९७९ मध्ये काही तरुणांनी एकत्र येत विधायक उद्देश ठेवून या गणेशोत्सवाची सुरुवात केली. या मंडळाने गणेशोत्सवात देशभरातील अनेक मंदिरशिल्पे साकारुन ठाणेकरांना भारतातील मंदिरांचे दर्शन घडविले आहे. त्यामुळे या गणेशोत्सव मंडळातील गणपती ‘ठाण्याचा राजा’ म्हणून राज्यभर ओळखला जात आहे. यंदाही या गणेशोत्सव मंडळात महाराष्ट्रातील अकरा जागृत मारूतीरायांचे दर्शन घडविले आहे. पुरातन मंदिराची प्रतिकृती साकारून अकरा मारूतींचे एकाच ठिकाणी दर्शन घडविणारा हा देखावा पाहण्यास भाविकांची गर्दी होत आहे.

पत्ता : पाचपाखाडी, ठाणे (प).

२) कोलबाड मित्र मंडळ

कोलबाड मित्र मंडळाची स्थापना १९८२ मध्ये झाली. यंदा या मंडळातील गणेशोत्सवाचे ४४ वे वर्षे आहे. या मंडळाचे वैशिष्ट्ये म्हणजे या मंडळ परिसरातील सर्व रहिवाशी एकत्रित येत गणेशोत्सवाची तयारी करतात. दरवर्षी या मंडळात कलात्मक आणि सामाजिक संदेश देणारा देखावा साकारला जातो. हा देखावा महिला, तरुण मुले तसेच मंडळातली इतर सदस्य यांच्या संकल्पनेतून साकारला जातो. यंदा या मंडळातील देखाव्याच्या माध्यमातून देहदान -अवयव दान संदर्भात जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

पत्ता : जागमाता मंदिरा समोरील पटांगण, कोलबाड, ठाणे (प).

३) श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळ

श्रीरंग सहनिवास गणेशोत्सवाची स्थापना १९७१ मध्ये झाली असून यंदा या मंडळाचे ५५ वर्षे आहे. या मंडाळाचे वैशिष्ट्ये म्हणजे हे मंडळ केवळ गणेशोत्सवच नाही तर, इतर सामाजिक आणि पर्यावरणपूरक असे विविध उपक्रम वर्षेभर करत असतात. गणेशोत्सवात दरवर्षी देखाव्याच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचे काम हे मंडळ करते. यंदा सिनेमा तंत्रज्ञान कला आणि स्वप्नांचा संगम या विषयावर या मंडळाने देखावा सादर केला आहे. या देखाव्याच्या माध्यमातून सिनेमाक्षेत्रात देखील विविध नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत, त्यामुळे आजच्या पिढीने या क्षेत्राचा देखील विचार करायला पाहिजे असा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

पत्ता : श्रीरंग विद्यालय, श्रीरंग सोसायटी ठाणे (प).

४) डवलेनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

डवलेनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे ४१ वे वर्षे आहे. या मंडळाच्या माध्यमातून वर्षेभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. गणेशोत्सवात देखील या मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक विषयांवर आधारित देखावे सादर केले जातात. यंदाच्या वर्षी गड संवर्धन या विषयावर देखावा तयार करण्यात आला आहे. या देखाव्याच्या माध्यमातून गड संवर्धन करणाऱ्या शिवप्रेमींच्या कार्याचे देखील कौतूक करण्यात आले आहे.

पत्ता : डवलेनगर, लोकमान्य डेपो जवळ, ठाणे (प)

५) विठ्ठल क्रिडा मंडळ

विठ्ठल क्रिडा मंडळाचे यंदा ५० वे वर्षे आहे. या मंडळातील गणपतीची मूर्तीचे नेहमीच आकर्षण असते. यंदा श्रीकृष्णाच्या रुपात ११ फुटी मूर्ती साकारण्यात आली आहे. तसेच या मंडळाचा देखावा देखील सुरेख आणि सामाजिक संदेश देणारा असतो. यंदा हे मानवा तुझा धर्म या विषयावर आरास साकारण्यात आली आहे.

पत्ता : विठ्ठल क्रिडा मंडळ, विठ्ठल मंदिराजवळ, चैतीनगर पाडा नं ३ लोकमान्य नगर, ठाणे (प)