ठाणे : ठाणे महापालिका Thane Municipal Corporation क्षेत्रात होणारा पाणी पुरवठा पुरेसा नसल्यामुळे विविध भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण होत असून ही समस्या सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाने मुंबई महापालिकेकडे वाढीव ५० दशलक्षलीटर पाणी देण्याची मागणी केली होती. परंतु मुंबई महापालिकेने केवळ ५ दशलक्षलीटर वाढीव पाणी दिले आहे. हे पाणी घोडबंदर भागाकडे वळविण्यात आल्याने येथील रहिवाशांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी शहरातील टंचाईच्या झळा कायम आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २७ लाख इतकी आहे. शहरासाठी प्रतिदिन ६२१ दशलक्षलीटर इतक्या पाण्याची गरज आहे. परंतु शहराला प्रत्यक्षात दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्ष लीटर, स्टेम कंपनीकडून ११५ दशलक्ष लीटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. वाढत्या लोकवस्तीमुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. यावर मात करण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने मुंबई महापालिकेकडे ५० दशलक्षलीटर वाढीव पाणी देण्याची मागणी केली होती. त्यासाठी पालिका प्रशासनामार्फत सातत्याने पाठपुरावा सुरू होता. मुंबई महापालिकेने ठाणे महापालिकेची मागणी मान्य केली पण, ५० ऐवजी केवळ दशलक्षलीटर इतकेच वाढीव पाणी उपलब्ध करून दिले आहे.
घोडबंदर भागाला काहीसा दिलासा
मुंबई महापालिकेकडून ठाणे शहराला ८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होतो. या पाण्याचे वितरण शहरातील किसन नगर १ व २, वागळे इस्टेट, इंदिरा नगर, कोपरी, गावदेवी, बाळकुम आणि घोडबंदर भागात करण्यात येते. यातील घोडबंदर भागाचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. या भागात मोठमोठी गृहसंकुले उभी राहिली आहेत. याठिकाणी आजही गृहसंकुले उभारणीची कामे सुरू आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या मानाने येथे होणारा पाणी पुरवठा अपुरा पडू लागला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असून अनेक संकुले टँकरने पाणी विकत घेत आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेने दिलेले ५ दशलक्षलीटर वाढीव पाणी घोडबंदर भागाकडे वळविण्यात आले आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.
कोणत्या भागाला किती पाणी पुरवठा होतो
ठाणे महापालिका क्षेत्रातील घोडबंदर म्हणजेच माजीवाडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात ११५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होत होता. मुंबई महापालिकेने दिलेल्या वाढीव पाण्यामुळे आता याठिकाणी १२० दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होत आहे. मात्र, तोही पुरेसा नाही. वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रात ६५ दशलक्षलीटर, कळवा प्रभाग समिती क्षेत्रात ६८ दशलक्षलीटर, दिवा प्रभाग समिती क्षेत्रात ६५ दशलक्षलीटर, मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात ६८ दशलक्षलीटर, वागळे इस्टेट प्रभाग समिती क्षेत्रात ५३ दशलक्षलीटर, लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती क्षेत्रात ४५ दशलक्षलीटर, उथळसर प्रभाग समिती क्षेत्रात ५५ दशलक्षलीटर, नौपाडा प्रभाग समिती क्षेत्रात ५१ दशलक्षलीटर असा एकूण ५८५ दशलक्षलीटर इतका प्रतिदिन पाणी पुरवठा होतो. असे असले तरी शहराला अजूनही ३१ दशलक्षलीटर इतक्या वाढीव पाण्याची गरज आहे. यामुळे ठाण्याला आणखी २० दशलक्ष लीटर वाढीव पाणी पुरवठा देण्याच्या मागणीचे पत्र ठाणे महापालिकेने मुंबई महापालिकेला दिले आहे.