ठाणे : घोडबंदर येथील गायमुख घाट भागात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठाणे महापालिकेकडून एकत्रितरित्या दुरुस्ती केली जाणार आहे. सुमारे दोन आठवड्यापूर्वीच घोडबंदर मार्गावर मिरा भाईंदर महापालिकेने दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. त्यानंतर आता ठाणे महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरुस्ती काम सुरु केले जाणार असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात विविध प्राधिकरणांकडून मार्गावर दुरुस्ती झाल्या होत्या. त्यामुळे या मार्गावर कितीवेळा दुरुस्ती करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
घोडबंदर येथील गायमुख घाट मार्गातून मोठ्याप्रमाणात अवजड आणि हलक्या वाहनांची वाहतुक होते. घोडबंदर येथील कापूरबावडी ते फाऊंटन हाॅटेल पर्यंतचा मार्ग ठाणे महापालिका आणि मिरा भाईंदर महापालिकेच्या हद्दीत आहे. तर काही भाग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरुस्त केला जातो. गेल्याकाही वर्षांपासून कापूरबावडी ते गायमुख भागात मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरु आहे. तर गायमुख चौपाटी ते फाऊंटन हाॅटेल हा मार्ग घाट रस्ता आहे.
कापूरबावडी, मानपाडा, ब्रम्हांड, पातलीपाडा, कासारवडवली आणि ओवळे भागात मोठ्याप्रमाणात लोकवस्ती वाढली असून या वाहनांचा भारही घोडबंदर मार्गावर असतो. घाट रस्ता परिसरात लोकवस्ती तुलनेने कमी असली तरी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या डोंगरातून वाहणारे पाणी घाटात येत असते. येथील रस्त्यांची तात्पुरती डागडुजी, अवजड वाहनांची वाहतुक आणि पावसाचे पाणी यामुळे दरवर्षी या मार्गावर खड्डे पडतात. या मार्गावर अनेकदा दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली होती. कामे करुनही हा मार्ग पूर्णत: सुस्थितीत होत नसल्याने प्रशासनाच्या कामावरही प्रश्चचिन्ह निर्माण होऊ लागले आहेत.
११ ऑक्टोबरला गायमुख घाटाजवळील इंडियन ऑइल पेट्रोल पंप ते निरा केंद्र या भागाच्या दुरुस्तीचे काम मिरा भाईंदर महापालिकेने सुरु केले होते. किमान तीन ते चार दिवस हे काम घाटात सुरु होते. त्यानंतर आता ठाणे महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गायमुख घाटात ५०० ते ६०० मीटर इतक्या रस्त्याची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यासंदर्भात नुकतीच ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासोबत महापालिका अधिकारी, वाहतुक शाखेचे अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली.
मिरा भाईंदर महापालिकेकडून काम सुरु होते. त्यावेळी मुंबई अहमदाबाद मार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती. या वाहतुक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी समाजमाध्यमावर संताप व्यक्त केला होता. आता पुन्हा एकदा ठाणे महापालिकेने येथील गायमुख घाट परिसरात दुरुस्ती कामाचा निर्णय घेतल्याने वाहतुक कोंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनही या भागात दुरुस्ती केली जाणार आहे. वाहतुक पोलिसांनी दोन्ही प्राधिकरणांना एकत्रित काम करण्याच्या सूचना केल्या आहेत. ही नोव्हेंबर महिन्यात सुरु होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ठाणे वाहतुक शाखेच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता, काही दिवसांपूर्वीच या भागात दुरुस्ती कामे मिरा भाईंदर महापालिकेने केली होती. आता ठाणे महापालिकेकडून केले जाणार आहे. परंतु हे काम सुरु करण्यापूर्वी समाजमाध्यमावर जनजागृती केली जाईल. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या वाहतुक नियोजनामध्ये बदल करता येईल असे त्यांनी स्पष्ट केले.
गायमुख घाटातील दुरुस्तीसाठी निविदा काढली आहे. परंतु कामास अद्याप अवधी आहे असे ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
