ठाणे : मुंबई, पालघर आणि गुजरात भागातील वाहतूकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोडबंदर मार्गावरील गायमुख घाट रस्त्याच्या ठाणे-मीरारोड मार्गिकेच्या दुरुस्तीचे काम महिनाभरापूर्वी करण्यात आले होते. तर, यंदा लवकरच सुरू झालेल्या पावसामुळे मीरारोड- ठाणे मार्गिकेच्या दुरुस्तीचे काम करण्यात आलेले नसून या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्याच्या दुरावस्थेवरून शिवसेना नेते राजन विचारे यांनी संताप व्यक्त करत भ्रष्टाचार करण्यात, पक्ष फोडण्यातच हे सरकार मश्गूल असल्याची टीका केली आहे.
घोडबंदर मार्गावरील गायमुख घाट परिसरातील रस्ता डांबरी असून त्यावर दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडतात. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात अवज़ड वाहनांची वाहतूक सुरू असते. खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावून कोंडी होते. मुंबई, पालघर, तसेच गुजरात भागातील वाहतूकीसाठी हा रस्ता महत्वाचा मानला जातो. हा रस्ता काँक्रीटचा करण्याचा विचार सार्वजनिक बांधकाम विभागाचा होता. मात्र, वन विभागाकडून त्यास परवानगी मिळत नसल्याची बाब उघडकीस आली होती. परवानगी मिळत नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरवर्षी डांबरी रस्त्याची दुरुस्ती करण्यात येते. यामुळे खड्डे आणि कोंडी ही समस्या दरवर्षी दिसून येते.
यंदा खड्डे आणि कोंडी ही समस्या सोडविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सिमेंट ग्राउटेड बिटुमिनस मिक्स (सीजीबीएम) या पद्धतीने रस्त्याचे काम करण्याचा निर्णय घेऊन एप्रिल महिन्यात ठाण्याहून मीरारोडकडे जाणाऱ्या मार्गिकेची दुरुस्ती केली होती. जून महिन्यात ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली होती. तर मीरारोडहुन ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेचे काम हाती घेतले जाणार होते.
मात्र, यंदा लवकरच सुरू झालेल्या पावसामुळे मीरारोड- ठाणे मार्गिकेच्या दुरुस्तीचे काम करण्यात आलेले नसून या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्याच्या दुरावस्थेवरून शिवसेना नेते राजन विचारे यांनी संताप व्यक्त केला आहे. शिवसेना नेते राजन विचारे यांनी समाज माध्यमांवर गायमुख रस्त्याच्या दुरावस्थेचे लाईव्ह करत या रस्त्याची झालेली दुरवस्था दाखवली. डांबर वाहून गेल्याने खडी वर आली असून वाहनचालक जीव मुठीत घेऊन प्रवास करीत असल्याचे चित्र त्यांनी लाईव्हमध्ये दाखविले. या रस्त्याची दुरवस्था पाहा, असे सांगत या भ्रष्ट सरकारला नागरिकांचे हाल दिसत नाहीत. भ्रष्टाचार करण्यात अन् पक्ष फोडण्यातच हे सरकार मश्गूल आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
पक्ष फोडण्यापेक्षा विकासकामांकडे लक्ष द्या
मिरा भाईंदरहून ठाण्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांना दचके खात प्रवास करावा लागत आहे. या महामार्गावरील गायमुख घाट, कासारवडवली या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामूळे वाहतूक कोंडीसह वाहनचालकांचे अपघात होऊ लागले आहेत. एकीकडे रस्त्यांची दुरावस्था तर दुसरीकडे इतर प्राधिकरणाची टोलवाटोलवी सुरू असल्याने रस्ताची संपूर्ण वाताहत झाली आहे. आठ दिवसांपुर्वी तयार केलेल्या रस्त्यावरील माती, खडी पुन्हा जैसे थे असल्याने नागरिकांचा संताप अनावर होऊ लागला आहे. रस्ते दुरुस्तीकडे दुर्लक्ष असलेल्या सत्ताधाऱ्यांनी पक्ष फोडण्यापेक्षा विकासकामांकडे आता तरी लक्ष घालावे, असा टोला विचारे यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.