ठाणे – मुंबईत प्रवास करणे सगळ्यात जास्त सोयीस्कर मानले जाते. रेल्वे, बस, रिक्षा, टॅक्सी… एकंदर काय तर मुंबईकरांची गाडी चोवीस तास धावत असते. मात्र मागील काही दिवसांपासून घोडबंदर रस्त्यावर सुरू असलेल्या वाहतूक कोंडी तसेच रस्त्याची दुरवस्था ही गंभीर समस्या बनली आहे. याचा फटका आता केवळ सर्वसामान्यांनाच नव्हे तर सेलिब्रिटींनाही बसू लागला आहे. मराठी अभिनेत्री रुपाली भोसले हिने नुकताच समाज माध्यमांवर एक व्हिडिओ शेअर करत घोडबंदर रस्त्यावरील स्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तिच्या मते, “घोडबंदर रस्त्याची काय अवस्था आहे, किती वर्ष असा प्रवास करायचा?” असा सवाल तिने उपस्थित केला आहे.
पाच वर्षांपासून असाच आहे रस्ता…
रुपाली भोसले हिने यापूर्वी ‘आई कुठे काय करते’ मालिकेसाठी विरारहून ठाण्यापर्यंत सतत प्रवास केला होता. त्या काळातही घोडबंदर रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य होते आणि प्रवास त्रासदायक होता, असं ती सांगते. “मी आजही पाहते तेव्हाची परिस्थिती बदललेलीच नाही. रात्रभर शूटिंग करून आज सकाळी ५.३० वाजता घरी निघाले, तर घोडबंदर रस्त्यावर आधी ट्रॅफिक आणि मग हा सुंदर रस्ता… १२-१४ तासांचे शूट आणि त्यानंतर दोन तास असा प्रवास… हे नीट कधी होणार?” असा प्रश्न तिने उपस्थित केला.
सेलिब्रिटींचाही आवाज उठतोय
अभिनेत्री रुपाली भोसलेच्या आधी देखील काही कलाकारांनी अशाच प्रकारच्या पोस्ट शेअर करत ठाण्यातील वाहतूक कोंडी आणि रस्त्याच्या दुरवस्थेवर नाराजी व्यक्त केली होती. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, अपूर्वा नेमळेकर, अभिजित केळकर यांसारख्या कलाकारांनी तोडगा काढण्याची मागणी केली होती.
पोस्टवर नेटकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया
रूपाली भोसले हिच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील सहमती दर्शवत कमेंट मध्येही संताप जनक भावना व्यक्त केल्या आहेत. “आपल्याकडे चांगले राजकारणी नाहीत.. सरकारी कर्मचारी, राजकारणी यांना कॉन्ट्रॅक्टरने विकत घेतले आहे. आपण फक्त टॅक्स भरायचा आणि खुश राहायचे”, “खरंच खूप खराब रस्ते आहेत”, “टोल घेणार, टॅक्स घेणार आणि रस्ते विकास मात्र शून्य” “जोपर्यंत घोडबंदर रस्त्यावरील मेट्रोचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत हे असेच सुरू राहणार.. तोपर्यंत त्रास सहन करावा लागेल” अशा प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी देखील घोडबंदर मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडी तसेच रस्त्याच्या दुरवस्थेवर आपली मते मांडली आहेत.