Thane News ठाणे- ठाणे शहरातील गोखले रोड परिसरात गुरुवारी रात्री टीएमटी (TMT) बस थेट रस्त्याच्या दुभाजकावर चढल्याची घटना घडली. अपघातानंतर परिसरातील दुभाजकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत असून, सामाजिक कार्यकर्ते संगम डोंगरे यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अरुंद रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने उभारण्यात आलेले दुभाजक आणि पुसट झालेल्या मार्गदर्शक रेषांमुळे वाहनचालकांना अपघाताचा धोका असल्याचा आरोप त्यांनी केला. महापालिकेने लवकरच उपाययोजना केली नाही तर, ते स्वतः रंगरंगोटी करतील आणि आंदोलन छेडतील, असा इशारा त्यांनी दिला.
ठाणे स्थानकजवळ असलेला गोखले रोड परिसरातील रस्ते अरुंद आहेत. त्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने उभी केली जातात.त्यामुळे वाहतूकीस हा रस्ता आणखी लहान पडतो. त्यामुळे या दुभाजकाला परिसरातील नागरिकांचा आणि व्यापाऱ्यांचा विरोध होता. तरी देखील गोखले रोड, राम मारूती रोड परिसरात महापालिकेने हे दुभाजक बांधले. परंतु या दुभाजकांमुळे वाहतूक कोंडी होत होती. त्यानंतर, काही व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरून येथील दुभाजक काढून फेकून दिले होते. त्यावेळी महापालिकेने दुभाजक बसविताना वाहतूक पोलिसांना कळविले नसल्याचे समोर आले होते. त्यामुळे महापालिकेच्या कार्यपद्धतीविषयी व्यापाऱ्यांकडून टिका होत होती. परंतु, त्यानंतरही ठाणे महापालिकेने हे दुभाजक बांधले.
ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त यांनी हे दुभाजक ठाण्यातील बाबाच्या सांगण्यावरुन बांधले असल्याचा आरोप संगम डोंगरे यांनी केला आहे. हे दुभाजक वाहनचालकांसाठी घातक ठरत आहेत. त्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने उभी असतात. त्यामुळे या रस्त्यावरुन एकावेळी एकच वाहन जाऊ शकते. काही दिवसांपूर्वी या परिसरातील मढवी हाऊसला आग लागली होती. तेव्हा अग्निशमन गाडीला जायला रस्ता नव्हता. त्यावेळी हे दुभाजक तोडण्यात आले होते. त्यामुळे याठिकाणी दुभाजक नको अशी मागणी नागरिकांची आणि व्यापाऱ्यांची आहे, असे संगम डोंगरे यांनी सांगितले.
परंतु, याकडे प्रशासन लक्ष देत नाही. नागरिकांची ही बाजू आम्ही वारंवार मांडत आलो आहोत. या दुभाजकांचा त्रास प्रत्येक वाहन चालकास होत आहे. दुभाजकावरील मार्गदर्शक रेषा पुसट झाल्या आहेत. त्यामुळेच बस चाकलकाला दुभाजक दिसून आले नाही आणि बस दुभाजकावर चढली यात बस चालकाची नाही तर, ठाणे महापालिकेची चूक आहे. बस चालक हे माळकरी आहेत. ते व्यवस्थित गाडी चालवत होते. परंतु, त्याचवेळी तेथून दुचाकी येत होती त्या दुचाकीला वाचविण्याच्या नादात टीएमटी चालकाकडून बस दुभाजकावर चढली असे संगम डोंगरे यांनी स्पष्ट केले.
ठाणे महापालिकेने या दुभाजकाच्या मार्गदर्शक रेषांना रंग लावला नाही तर, संगम डोंगरे स्वखर्चाने हे काम करेल. महापालिका प्रशासनाला जर वेळेत जाग आली नाही तर, पुन्हा एकदा याठिकाणी आंदोलन छेडेले जाईल असा इशारा संगम डोंगरे यांनी यावेळी दिला आहे.