कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांचा भ्रमनिरास; महापालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई नाही
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका आणि दिवाळी संपल्यानंतर महापालिका प्रशासन फेरीवाल्यांविरोधात आक्रमक भूमिका घेईल, असे सामान्यांना वाटत होते, पण त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. कल्याण-डोंबिवली रेल्वे स्थानकांभोवतीचा फेरीवाल्यांचा विळखा कायम असल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
कल्याण पश्चिमेतील स्कायवॉकवर सुमारे ५० ते ६० फेरीवाले प्रवाशांचा रस्ता अडवून बसले आहेत. रेल्वेचे पोलीस स्कायवॉकवर त्यांच्या हद्दीत गस्त घालत आहेत. त्यामुळे फेरीवाले रेल्वे हद्द सोडून महापालिकेच्या हद्दीत बसत आहेत. महापालिकेचे कर्मचारी स्कायवॉकवर अजिबात फिरकत नसल्याने फेरीवाले आपले बस्तान सोडण्यास तयार नसल्याचे समजते. शिवाजी चौक, महमद अली चौक, महालक्ष्मी हॉटेल रस्ता फेरीवाल्यांनी गजबजून जात असल्याने या भागातून ये-जा करणे नागरिकांना शक्य होत नाही.
अशीच परिस्थिती डोंबिवली पूर्व भागात आहे. डोंबिवली पूर्व भागातील सर्व गल्लीबोळ, मुख्य रस्ते फेरीवाल्यांनी गजबजून गेले आहेत. आयुक्त ई. रवींद्रन यांनी सुरुवातीला फेरीवाल्यांना हटविण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती. तरीही कारवाई थंडावल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
आयुक्तांनी सफाई कामगारांवर, हजेरी शेडवर नजर ठेवण्यासाठी जशी उपायुक्त, उपअभियंते यांची फिरती पथके स्थापन केली आहेत. तशाच प्रकारची पथके फेरीवाल्यांना हटवण्यासाठी स्थापन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. फेरीवाला पथकात वर्षांनुवर्षे ठरावीक कामगार काम करीत आहेत. हे कामगार आणि काही अधिकाऱ्यांचे साटेलोटे आहे, अशा तक्रारी होत आहेत. आयुक्त रवींद्रन यांनी टिटवाळ्यातील कर्मचारी डोंबिवलीत, डोंबिवलीतील कर्मचारी टिटवाळ्यात, कल्याणमधील कर्मचारी टिटवाळ्यात अशा फिरत्या क्रमाने कर्मचाऱ्यांच्या फेरीवाला हटाव पथकात नियुक्त्या केल्या तर फेरीवाल्यांचा बंदोबस्त करणे शक्य होणार आहे, असे एका उच्चपदस्थ पालिका अधिकाऱ्याने सांगितले.
