HinduRituals, FoodDonation : ठाणे: सध्या पितृपक्षाचा कालावधी सूरु आहे. पितृपक्ष म्हणजे आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्याचा आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ असतो. पूर्वजांच्या आशीर्वादामुळे कुटुंबात सुख-समृद्धी, आरोग्य आणि शांती राहते, असे म्हटले जाते. त्यामुळे याकालावधीत पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी श्राद्ध, तर्पण आणि अन्नदान केले जाते.
अनेकांना हे अन्न घरात शिजविणे शक्य नसते, त्यामुळे छोट-छोट्या खाणावळ मधून हे अन्न मागवले जात. परंतू, आता यामध्ये मोठ-मोठे हॉटेल्स देखील सहभागी होऊ लागले आहेत. ठाण्यातील अशाच एका हॉटेलने पितृपक्षानिमित्त अन्नदान महापर्व सुरु केले आहे. या उपक्रमाला ८ सप्टेंबर प्रतिपदा श्राद्ध पासून सुरुवात झाली असून २१ सप्टेंबर सर्वपित्री अमावस्यापर्यंत हे अन्नदान महापर्व सुरु राहणार आहे.
हिंदू पंचांगानुसार भाद्रपद पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्णपक्षातील १५ दिवसांना ‘पितृपक्ष’ किंवा ‘महालय’ असे म्हणतात. हिंदू धर्मात पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवसांना विशेष महत्त्व दिले जाते. या कालावधीतील शेवटचा दिवस म्हणजे पितृपक्ष अमावस्या हा दिवस पितृपक्षातील सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो.
पितृपक्षाच्या काळात आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ समाजातील अनेक संस्था आणि नागरिकांकडून अन्नदानाचे कार्यक्रम राबविले जातात. मंदिर परिसर, रुग्णालये, अनाथाश्रम तसेच गरजूंसाठी कार्यरत संस्थांमध्ये अन्नदानाचे आयोजन केले जाते. पूर्वी घरच्या घरी अन्न शिजवून ते दान केले जायचे. परंतू, आता धकाधकीच्या जीवनात इतके अन्न घरी शिजविणे अनेकांना शक्य होत नाही त्यामुळे बाहेर खाणावळीत किंवा हॉटेलमध्ये अन्नाची ऑर्डर दिली जाते. परंतू, पुन्हा प्रश्न येतोच की हे अन्नदान नक्की कुठे करायचे, मग त्या जागेची शोधाशोध यात बराच वेळ खर्चिक होत असे. यावर उपाय म्हणून नागरिकांचा वेळ आणि श्रम वाचविण्यासाठी हॉटेलचालक आता पुढे सरसावलेले पाहायला मिळत आहेत.
ठाणे शहरातील स्पाईस अप या हॉटेलने ‘पितृपक्ष अन्नदान महापर्व’ हा उपक्रम सुरु केला आहे. हा उपक्रम ८ सप्टेंबरपासून सुरु झाला असून २१ सप्टेंबर पर्यंत असणार आहे. या उपक्रमात आपल्या पूर्वजांच्या तिथीनुसार तुम्ही अन्नदान करु शकणार आहात. जीरा राईस, डाळ फ्राय, फुलके, छोले, गुलाबजाम असा भोजनाचा मेनू हॉटेलने ठरविलेला आहे. ११ जणांच्या भोजनाचा २१०० रुपये तर, २१ जणांच्या भोजणाचा ४००० रुपये इतके शुल्क आकारले जातात. तसेच या हॉटेल सोबत काही संस्था जोडल्या गेल्या आहेत. त्या संस्थांना तुम्ही हे अन्नदान करु शकतात. यामध्ये जीवन संवर्धन, दिव्यप्रभा, बाल स्नेहालय, क्षमता फाऊंडेशन, स्नेहालय चॅरिटेबल ट्रस्ट, सिग्नल शाळा या संस्थांचा समावेश आहे, अशी माहिती हॉटेलचे प्रमुख नंदन जोगळेकर आणि राहूल गुर्जर यांनी दिली.
हे आहे पितृपक्षाचे महत्त्व
- या काळात पितरांचा आत्मा पृथ्वीवर येतो, असे मानले जाते.
- श्राद्ध आणि अन्नदानाद्वारे त्यांना शांती व समाधान लाभते.
- पूर्वजांच्या आशीर्वादामुळे कुटुंबात सुख-समृद्धी, आरोग्य आणि शांती राहते.
- हा काळ कृतज्ञता आणि स्मरणाचा मानला जातो.