ठाणे – लोकमान्य नगर भागातील पाडा नंबर ४ येथे असलेल्या घरावर मंगळवारी सकाळी मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. दरड कोसळून घराचे नुकसान झाले. तर, या घटनेत अमरनाथ शर्मा (७०) यांना दुखापत झाली. या घर परिसरातील इतर रहिवाशांना धोका टाळण्यासाठी चार घरे रिकामी करून त्यांना त्यांच्या नातेवाईकांकडे राहण्याची सोय केली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह ठाणे शहरात मुसळधार पाऊस कोसळत आहे . ठाण्यात सोमवारी दिवसभर मुसळधार पाऊस कोसळत होता. मंगळवारीही पहाटे पासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे ठाणे महापालिका क्षेत्रातील अनेक परिसरामध्ये विविध घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर लोकमान्य नगर भागातील पाडा नंबर ४ येथील संतोष पाटील नगर परिसरात असलेल्या चाळीतील घरावर मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास अचानक दरड कोसळल्याची घटना घडली.

या घटनेची माहिती मिळताच, उपायुक्त दिनेश तायडे, लोकमान्य प्रभाग समिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता तसेच अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. दरड कोसळलेल्या भागाचा काही उर्वरित भाग संततधार पावसामुळे कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे संतोष पाटील नगर परिसरातील इतर रहिवाशांना धोका टाळण्यासाठी चार घरे रिकामी करून त्यांना त्यांच्या नातेवाईकांकडे राहण्याची सोय केली आहे. तर, दरड कोसळल्यामुळे जय मातेरे यांच्या घराचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. या घटनेत अमरनाथ शर्मा (७०) यांच्या कमरेला आणि खांद्याला दुखापत झाली आहे. अमरनाथ यांना उपचारासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळी सुरक्षेच्या कारणास्तव संतोष पाटील नगरमधील चार घरे रिकामी करण्यात आली असून धोका पट्टी लावण्यात आली आहे. तसेच डोंगरावरून येणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने चर मारून देण्यात आली आहे.

मंगळवारी पावसामुळे या भागात घडल्या घटना

दिवा, दातिवली, गणेशपाडा, डायघर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले. कोपरी येथील रामभाऊ मार्ग, येऊर येथील कोपरकर बंगल्याजवळील परिसर, येऊर गाव, माजिवाडा येथील साईनाथ नगर, कोर्टनाका येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय परिसर, तहसीलदार कार्यालय परिसर, शीळफाटा रोड, खर्डी दिवा रोड, ठाण्यातील श्रीरंग विद्यालय आणि सोसायटी परिसर, घोडबंदर चेना पुल, वृंदावन परिसर, ठाण्यातील आंबेडकरनगर येथील नाला परिसर, कासारवडवली येथील टायटन रु्गणालयाच्या मागील परिसर, मुंब्रा देवी काॅलनी परिसर याठिकाणी पाणी साचले होते. कोपरी आनंदनगर बुद्ध विहार परिसर, भाईंदरपाडा भागात घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत.