ठाणे : मध्य रेल्वेच्या धिम्या मार्गिकेवरील ठाणे- कळवा स्थानका दरम्यान बुधवारी रेल्वे रुळावर सिमेंटचा पोल (फाऊलिंग मार्क) ठेवण्यात आला होता. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घातपात घडविण्याच्या उद्देशाने हा पोल रुळावर ठेवण्यात आल्याची प्राथमिक तपासात समोर आली आहे. कल्याणला जाणारी उपनगरीय रेल्वेगाडी देखील या पोलला धडकली होती. सुदैवाने यात कोणतीही दुर्घटना झाली नाही.

मध्य रेल्वे मार्गावर मुंबईहून कल्याणच्या दिशेने धिमी रेल्वेगाडी निघाली होती. ही रेल्वेगाडी ठाणे- कळवा रेल्वे स्थानका दरम्यान रात्री १०.३० वाजताच्या सुमरास कळवा स्थानक परिसरातील गोपाळनगर येथे आली असता, रेल्वे रुळावर ठेवण्यात आलेल्या सिमेंटच्या पोलला तिची धडक बसली. या घटनेची माहिती रेल्वेगाडीतील गार्डने वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यानंतर तेथील पर्यवेक्षण करण्यात आले. रेल्वे अधिकारी, रेल्वे सुरक्षा दल आणि पोलिसांनी पाहणी केली असता, तेथे फाऊलिंग मार्कचा सिमेंट पोल आढळून आला.

या पोलचे तुकडे रेल्वे रुळावर पडले होते. या घटनेनंतर सुमारे सात ते आठ मिनीटांनी रेल्वेगाडी कल्याणच्या दिशेने रवाना करण्यात आली. रेल्वेगाडीला नुकसान झाले नाही. तसेच प्रवासी देखील सुखरुप होते अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात भारतीय रेल्वे अधिनियम १९८९ चे कलम १५० (१) (अ) आणि भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२५ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डाॅ. स्वप्नील नीला यांना विचारले असता, याबाबत गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच हा सिमेंटचा पोल कोणी ठेवला किंवा तो रुळावर कसा आला याबाबत तपास सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

ठाणे -कळवा मार्गिके दरम्यान ही घटना घडली आहे. याबाबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणाचा तपास सुरू आहे. – अर्चना दुसाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ठाणे लोहमार्ग पोलीस.