Thane News: ठाणे : घोडबंदर मार्गाला पर्यायी रस्ता असलेल्या कोलशेत रस्त्यावर फेरीवाले आणि बेकायदा पार्किंगमुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असून, वायुसेनेच्या तक्रारीनंतरही महापालिकेने घेतलेला “ना फेरिवाला आणि ना पार्कींग क्षेत्र ” हा निर्णय केवळ कागदावरच राहिल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे रुंद रस्त्यावरील फेरीवाला अतिक्रमणासोबत बेकायदा वाहन पार्किंगमुळे वाहतुकीसाठी एकच मार्गिका उपलब्ध होत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे.

घोडबंदर रस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून ओळखले जाते. या मार्गावरून अनेक नागरिक प्रवास करतात. काही वर्षांपुर्वी या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. घोडबंदरच्या मुख्य मार्गावर कोंडी होत आहे. ती टाळण्यासाठी अनेकजण कोलशेत मार्गेच प्रवास करीत आहेत. त्यामुळे या मार्गावर वाहनांचा भार वाढला आहे. त्यातच गेल्या काही वर्षांपासून या मार्गावर फेरिवाल्यांचे अतिक्रमण वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. असे असतानाच, या रस्त्यावरील डि-मार्ट पासून ते कोलशेत गाव आणि लोढा अमारा वाय जंक्शनपासून वायु सेनेच्या स्थानकापर्यंतच्या अकबर कॅम्प परिसरातील रस्त्याच्या दोन्ही बाजूस फेरिवाले ठाण मांडून बसत आहेत. रस्त्यावर तसेच पदपथावर फेरिवाले गाड्या लावत असून यामध्ये खाद्य पदार्थांच्या गाड्यांसह पानटपऱ्यांचा समावेश आहे. पानटपऱ्या आणि खाद्य पदार्थ बनविणाऱ्या गाड्यांवर राजरोजपणे गॅस आणि स्टोव्हसारखी उपकरणे वापरली जात असून या गाड्या रात्री उशीरापर्यंत सुरू असतात. अकबर कॅम्प रोडला लागूनच भारतीय वायु सेनेचे स्थानक आहे. त्यामुळे हा परिसर अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून ओळखला जातो.

निर्णय कागदावरच

खाद्य पदार्थ गाड्यांवरील ज्वालाग्राही उपकरणांमुळे स्फोट होण्याची भीती व्यक्त करत वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी पालिकेकडे तक्रार केली होती. यानंतर खडबडून जाग आलेल्या ठाणे महापालिकेने कोलशेत रस्त्याच्या दोन्ही बाजू ना फेरिवाला आणि ना पार्कींग क्षेत्र करण्याचा निर्णय दोन महिन्यांपूर्वी घेतला होता. असे असले तरी हा निर्णय कागदावरच असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे रुंद रस्त्यावर फेरीवाल्याच्या अतिक्रमणासोबत बेकायदा पार्किंग होत असल्याने वाहतुकीसाठी एकच मार्गिका उपलब्ध होत आहे.

काय होता निर्णय

रस्त्यावरील डि-मार्टपासून ते कोलशेत गाव आणि लोढा अमारा वाय जंक्शनपासून वायु सेनेच्या स्थानकापर्यंतच्या अकबर कॅम्प परिसरातील रस्त्याच्या दोन्ही बाजू ना फेरिवाला आणि पार्किंग क्षेत्र करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याठिकाणी ना पार्किंग क्षेत्र असे फलकही लावण्यात येणार होते. यासंबंधीच्या प्रस्तावास प्रशाकीय सभेने मान्यता दिली होती. मात्र, असे फलक अद्याप लावण्यात आलेले नाहीत. रस्त्याची एक मार्गिकेवळ फेरीवाले बसत आहेत, त्यापुढच्या मार्गिकेवर दुहेरी पार्किंग होत आहे. यामुळे याठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. यासंदर्भात ठाणे महापालिकेच्या माजीवाडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त सोनल काळे यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांची प्रतिक्रिया मिळू शकले नाही.