ठाणे – नागरिकांच्या तक्रारी, अडचणी आणि समस्या जलद गतीने सोडवण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाने एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. “एक मेसेज व्हॉट्सॲपचा… तुमच्या समाधानाचा” या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या तक्रार निवारण उपक्रमाचे अनावरण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत ९९३०००११८५ हा खास व्हॉट्सॲप क्रमांक जिल्हा प्रशासनाने नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करून दिला आहे.

नागरिकांना दैनंदिन जीवनात जिल्हा प्रशासनाशी संबंधित अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो. जिल्ह्यातील ग्रामपंचायत, नगर परिषद किंवा महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांची दुरुस्ती, नाल्यांची स्वच्छता, पाणीपुरवठ्याची अडचण, तसेच आरोग्य केंद्रे व रुग्णालयातील सेवा सुधारणा यांसारख्या मूलभूत सुविधांपासून ते शाळा, महाविद्यालयांमधील शिक्षणव्यवस्थेतील त्रुटी, शिष्यवृत्ती, प्रवेश प्रक्रिया यांसारख्या शैक्षणिक बाबींपर्यंत अनेक विषय नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी निगडित असतात.

त्याचप्रमाणे सरकारी कार्यालयांमध्ये दाखल झालेल्या प्रकरणांना लागणारा विलंब, विविध परवानग्या, प्रमाणपत्रे, जमीन नोंदी, बांधकाम परवानग्या, पथदिवे, कचरा व्यवस्थापन, शेतकऱ्यांच्या शेतीसंबंधित समस्या, पिकविमा दावे, पाणी सिंचन प्रकल्प, सामाजिक सुरक्षा योजना, पेन्शन प्रकरणे आणि इतर कल्याणकारी योजना यामध्ये होणारी टाळाटाळ यामुळे नागरिक त्रस्त होतात.

अनेकदा तक्रारी योग्य अधिकाऱ्यांपर्यंत वेळेवर पोहोचत नाहीत किंवा त्यावर तातडीने कार्यवाही होत नाही, यामुळे निराकरणाला विलंब होतो. अशा वेळी तक्रार निवारणासाठी सरळ व थेट संवाद साधण्याचे माध्यम उपलब्ध झाल्यास नागरिकांचा वेळ, श्रम आणि आर्थिक खर्च वाचतो आणि समस्यांचे निराकरण वेगाने होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर नागरिकांच्या तक्रारी, अडचणी आणि समस्या जलद गतीने सोडवण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाने एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. “एक मेसेज व्हॉट्सॲपचा… तुमच्या समाधानाचा” या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या तक्रार निवारण उपक्रम सुरु केला आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील कुठल्याही भागातील नागरिकांना ९९३०००११८५ या क्रमांकावर आपली तक्रार, सूचना किंवा अडचण नोंदविता येणार असून, प्राप्त झालेल्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन त्यावर जलद कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयांचे वारंवार फेरे न मारता आपल्या समस्यांचे समाधान घरबसल्या मिळणार आहे.

या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, “या उपक्रमाचा उद्देश म्हणजे नागरिकांना त्यांच्या समस्यांवर जलद, पारदर्शक आणि प्रभावी तोडगा उपलब्ध करून देणे. ‘एक मेसेज व्हॉट्सॲपचा… तुमच्या समाधानाचा’ हे केवळ घोषवाक्य नसून, ते ठाणे जिल्हा प्रशासनाचे बांधिलकीचे वचन आहे. या माध्यमातून प्राप्त झालेल्या तक्रारींचे निवारण करण्यात प्रशासन कायम कटीबद्ध राहील.”