ठाणे : ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या आजाराच्या तीव्रतेनुसार एक महिन्याचे किंवा १५ दिवसांचे औषधे मोफत देण्यात येते. परंतु गेल्या डिसेंबर महिन्यापासून शासनाकडून औषधांचा पुरवठा होत नसल्यामुळे रुग्णालयात औषध टंचाई निर्माण झाली असून रुग्णालय प्रशासनाने ठाणे जिल्हा नियोजन समितीकडून निधी मिळवून औषध खरेदी केली. पण, तोही साठा दोन महिने पुरेल याप्रमाणे वापरावा लागत असल्याने काही रुग्णांना औषधे विकत घ्यावी लागत आहेत.
ठाणे शहरात प्रादेशिक मनोरुग्णालय आहे. या रुग्णालयात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या आठ जिल्ह्यातून मनोरुग्ण उपचारासाठी येतात. या रुग्णालयांमध्ये मानसिक आजाराग्रस्त असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात येतात. तसेच रुग्णांची मानसिक स्थिती लक्षात घेवून त्यांना रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात येतात. नैराश्य, स्किझोफ्रेनिया, बायपोलर डिसऑर्डर अशा मानसिक आजारांसाठी रुग्णांना औषधे आयुष्यभर घ्यावी लागतात. मनोरुग्णांचे औषधोपचार अचानक थांबल्यास त्यांच्यात चिडचिड, आक्रमकपणा, नैराश्य, झोप न लागणे, हिंसक प्रवृत्ती अशा गंभीर लक्षणांची वाढ होऊ शकते. काही वेळा असे रुग्ण कुटूंबियांसाठी आणि समाजासाठीही धोकादायक ठरू शकतात.
या रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात प्रतिदिन २५० ते ३०० उपचारासाठी येतात तर, रुग्णालयात सहाशेहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. बाह्यरुग्ण विभागात येणारे बहुतांशी रुग्णांना नियमित औषधे देण्यात येतात. यातील रुग्णांच्या आजाराच्या तीव्रतेनुसार एक महिन्याचे, १५ दिवसांचे औषधे मोफत देण्यात येते. परंतु, मागील डिसेंबर महिन्यापासून औषधांचा पुरवठा होत नसल्यामुळे त्याचा फटका रुग्णांना बसू लागला आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत औषधांचा पुरवठा करण्यात येतो. परंतु ठेकेदारांची देयके थकल्यामुळे ते औषधांचा पुरवठा करत नसल्यामुळे ही औषध टंचाई निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. या टंचाईवर मात करण्यासाठी मनोरुग्णालय प्रशासनाने ठाणे जिल्हा नियोजन समितीकडून निधी मिळवून औषध खरेदी केली. परंतु तोही दोन महिने पुरेल याप्रमाणे वापरला जात आहे, अशी माहीती सुत्रांनी दिली.
ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात दोन महिने पुरेल इतका औषधसाठा असून तो ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून घेण्यात आला होता. औषध खरेदी प्राधिकरणाला आम्ही मागणी कळविली असून त्यांच्यामार्फत औषधांचा पुरवठा लवकरच होईल, असे अतिरिक्त संचालक डॉ. सुनिता घोलाईत यांनी स्पष्ट केले.
प्रादेशिक मनोरुग्णालयाप्रमाणेच ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि स्त्री रुग्णालय अशा १५ रुग्णालयात दोन महिने पुरेल इतका औषध साठा शिल्लक आहे. ठेकेदारांची देयके थकल्यामुळे ते औषधांचा पुरवठा करण्यास तयार नसल्याची माहिती सुत्रांनी दिली. यामुळे या रुग्णालयांमध्येही औषधांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.