ठाणे : भिवंडी येथे मेट्रो कामा दरम्यान कंत्राटदाराकडून निष्काळजी होत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मंगळवारी मेट्रो कामावेळी रिक्षातून प्रवास करणाऱ्या एका तरुणाच्या डोक्यात लोखंडी राॅड शिरुन तो जखमी झाला आहे. तरुणावर भिवंडी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती गंभीर झाली. दरम्यान, तरुणाच्या उपचाराचा सर्व खर्च केला जात असून कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई केल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) दिली.
भिवंडी येथे ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो पाच प्रकल्पाच्या निर्माणाचे काम सुरू आहे. येथील धामणकर नाका परिसरात मेट्रो स्थानक उभारले जात आहे. दरम्यान, येथील स्थानकाखाली शेअर रिक्षाने तरुण प्रवास करत होता. त्याचवेळी धामणकर नाका मेट्रो स्थानकाचे काम सुरु असताना तेथील लोखंडी रॉड रिक्षात बसलेल्या तरुणाच्या डोक्यात शिरला. या घटनेनंतर तरुणाला स्थानिकांनी तात्काळ एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्याच्या डोक्यात दोन ते तीन इंच रॉड आत गेल्याचेही डॉक्टर म्हणाले. दरम्यान, या घटनेनंतर मेट्रो मार्गिका निर्माणाच्या कामाविषयी नागरिकांकडून प्रश्न विचारले जात आहेत.
एमएमआरडीएचे स्पष्टीकरण
एमएमआरडीएने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. एमएमआरडीएने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, मेट्रो पाच मार्गिकेच्या बांधकाम स्थळी घडलेल्या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करते, जिथे दोन महिन्यांपूर्वी स्लॅब स्ट्रक्चरला डेक करण्यासाठी तात्पुरत्या आधार प्रणालीचा भाग म्हणून बसवलेला टाय रॉड अचानक रिक्षावर पडला. त्यामुळे एका प्रवाशाच्या डोक्याला दुखापत झाली.
घटनेची माहिती मिळताच, मेसर्स अफकॉन्स, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आणि मेसर्स सिस्ट्रा-सीईजी-सिस्ट्रा इंडिया, जनरल कन्सल्टंट, या दोन्ही कंपन्यांचे सुरक्षा प्रमुख जखमी प्रवाशाला त्वरित आणि व्यापक वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी रुग्णालयात दाखल झाले. एमएमआरडीएने मेसर्स अफकॉन्सना सर्व वैद्यकीय खर्च उचलण्याचे आणि पीडित व्यक्तीला आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.सार्वजनिक सुरक्षितता आणि जबाबदारीचे सर्वोच्च मानक राखणे हे एमएमआरडीएच्या ध्येयाचे केंद्रबिंदू आहे. त्यानुसार, खालील कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
कंत्राटदारावर ५० लाखांचा दंड
एमएमआरडीएने स्पष्ट केले की, बांधकामासाठी जबाबदार असलेल्या मेसर्स अफकॉन्स, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरवर ५० लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. मेट्रो मार्गिका पाचचे जनरल कन्सल्टंट मेसर्स सिस्ट्रा-सीईजी-सिस्ट्रा (इंडिया) यांना पर्यवेक्षी त्रुटींसाठी पाच लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. या प्रकरणाची तटस्थ आणि तज्ञ चौकशी करण्यासाठी एआयसीएचे मुख्य सुरक्षा व्यवस्थापक, मेट्रो मार्गिका ‘दोन ब’चे जनरल कन्सल्टंट यांच्या अंतर्गत एक स्वतंत्र चौकशी स्थापन करण्यात आली आहे.चौकशीच्या निष्कर्षांवर आधारित पुढील कारवाई केली जाईल. एमएमआरडीए सर्व जबाबदारीचे उपाय लागू करेल आणि प्रणालीगत सुरक्षा सुधारणा त्वरित अंमलात आणल्या जातील याची खात्री करेल असेही एमएमआरडीएकडून स्पष्ट करण्यात आले.
अपघातांची मालिका
घोडबंदर येथील तत्वज्ञान विद्यापीठ परिसरात मेट्रो मार्गिकेच्या कामा दरम्यान ३० जुलैला मोटारीवर रॉड पडला होता. या घटनेत वाहन चालक थोडक्यात बचावला. याच भागात २ मे या दिवशी देखील असाच प्रकार उघड झाला होता. एका मोटारीवर क्रेनचा भाग कोसळला होता. त्यामुळे निष्काळजीची मालिका सुरु असल्याचे चित्र आहे.