ठाणे – कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत एमएमआरडीएने उभारलेला पलावा पूल शुभारंभाच्या काही तासातच चिखलमय झाल्याने प्रशासकीय यंत्रणांवर टिकेचे आसूड ओढले जात आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे आमदार, पदाधिकाऱ्यांवर मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते तुटून पडले आहेत. एकीकडे पलावा पुलाची घसरगुंडी समाज माध्यमांवर चर्चेचा विषय ठरली असतानाच आता ठाण्याचा कोलशेत मार्गावर पसरलेला चिखल वाहन चालकांच्या संतापाचे कारण ठरत आहे. ठाणे महापालिका, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्लूडी) सारखे विभाग नेमके करतात काय असा सवाल काॅग्रेस पक्षाने विचारला असून एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात हवा प्रदुषणास कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करण्याची मोहिम प्रशासनाने काही महिन्यांपुर्वी हाती घेतली होती. मात्र, ही मोहिम थंडावताच अनेक बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणाहून मातीची वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यांवर चिखल होऊ लागला असून घोडंबदर भागातील अंतर्गत वाहतूकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या कोलशेत रस्त्यावर हे चित्र दिसून आले. यामुळे रस्त्यावर दुचाकी घसरुन अपघातांची भिती व्यक्त होत आहे. घोडबंदर मार्गावर प्रवास करणे डोकेदुखीचे ठरत असताना कोलशेतचा चिखल आता प्रवाशांना नकोसा होऊ लागला आहे.
गेल्यावर्षी दिवाळीच्या कालावधीत ठाणे महापालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता खालावली होती. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला होता. उघड्यावर कचरा जाळणे, डम्परमधून माती आणि राडारोड्याची वाहतूक करताना त्यावर आच्छदन नसणे, बांधकामांची तोडफोड अशी विविध कारणे होती. यामुळे हवेची गुणवत्ता सुधारणेसाठी असे प्रकार रोखण्यासाठी पालिकेने नियमावली तयार करून शहरात दंडात्मक कारवाई सुरू केली होती. हि मोहिम काही महिन्यांपुर्वी थंडावताच डम्परमधून बंदिस्तपणे माती आणि राडारोड्याची वाहतूक होत असल्याने रस्त्यांवर चिखल होऊ लागला असून हे चित्र कोलशेत रस्त्यावर सातत्याने दिसून येत आहे.
गुरूवारी पुन्हा हे चित्र दिसून आले. घोडबंदरला पर्यायी रस्ता म्हणून कोलशेतचा रस्ता ओळखला जातो. घोडबंदर भागातील हा अंतर्गत रस्ता असून हा रस्ता वाहतूकीसाठी महत्वाचा मानला जातो. कोलशेतहून माजिवाड्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवर गुरूवारी सकाळी चिखल पडल्याचे दिसून आले. एका बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणाहून येणारे डम्परच्या वाहतूकीमुळे हा चिखल झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे वाहनचालकांचा प्रवास धोकादायक बनला आहे.
काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा
डम्परच्या चाकांमुळे माती रस्त्यावर पसरते, पावसामुळे ती चिखलात रूपांतरित होते आणि दुचाकीस्वारांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. हा प्रकार दररोज दिसत असूनही महापालिकेचे अधिकारी मौन बाळगून आहेत. कोलशेत रस्त्यावर काही विकासकांकडून नियमांचा सर्रास भंग केला जात असून, सार्वजनिक रस्त्यांवर माती, दगड, आणि चिखल पडून रहदारीस अडथळा निर्माण होतो आहे. काही ठिकाणी अपघाताचीही शक्यता निर्माण झाली आहे. विकासकांवर दंडात्मक कारवाई केली जावी, अशी मागणी ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी केली. लवकरात लवकर कारवाई झाली नाही, तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.