ठाणे : ठाणे जिल्ह्यातील वाहतुक कोंडीतून ठाणेकरांची सुटका व्हावी यासाठी मेट्रो प्रकल्पांची कामे सध्या सुरु आहेत. यातील मेट्रो चार प्रकल्प (वडाळा-घाटकोपर-कासारवडवली) आणि चार अ (कासारवडवली ते गायमुख) मार्गिकेच्या निर्माणाची कामे ठाणे शहरात सुरु आहेत. काही दिवसांपूर्वीच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या महिन्यात मेट्रोच्या चाचणीचा निर्णय घेतला होता. त्यासाठी मेट्रोच्या रुळावर डबे देखील चढविण्यात आले. परंतु चाचणीची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. त्यामुळे ही मेट्रो सध्यातरी या भागात प्रवास करणाऱ्यांसाठी शोभेची बाहुली ठरत आहे.
ठाणेकरांकडून देखील यावर तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवत आणि वाहतुक कोंडी, खड्ड्यांची समस्या नागरिकांनी विसरून जावी यासाठी तर हा प्रकार नाही का असा प्रश्न ठाणेकर विचारत आहेत.
ठाणे शहरात नागरिकरण वाढल्याने मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी होत आहे. त्याचा ताण मध्य रेल्वे, शहरातील सार्वजनिक वाहतुकीवर बसत आहे. त्यामुळे ठाण्यातील नोकरदारांना मुंबई गाठता यावी यासाठी एमएमआरडीएकडून मेट्रो चार आणि चार अ प्रकल्पाची निर्मिती केली जात आहे. या प्रकल्पांची कामे सध्या घोडबंदर भागातून सुरु आहे. घोडबंदर भागात पावसामुळे रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाची कामे, खड्ड्यांमुळे रस्त्याची झालेली वाईट अवस्था यामुळे घोडबंदर भागातून प्रवास करणाऱ्यांना कोंडीचा सामना सहन करावा लागतो. ऑगस्ट महिन्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेट्रोची चाचणी सप्टेंबर महिन्यात होणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर एमएमआरडीएकडून हालचालींना वेग आला.
ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मेट्रो मार्गिकेवर कोच उभारणीची कामे सुरु झाली. काही दिवसांपूर्वीच मेट्रो मार्गिकेवर मेट्रो ट्रेन सज्ज देखील झाली. त्यामुळे या भागातून प्रवास करणाऱ्यांची नजर मेट्रोच्या ट्रेनवर गेल्यास मेट्रो लवकरच धावणार अशी स्वप्न निर्माण होऊ लागली. तर काहीजण हा प्रकार म्हणजे स्थानिक स्वराज्य निवडणूकांसाठी सुरु असल्याची प्रतिक्रिया देत आहेत. मेट्रोची चाचणी या महिन्यात होणार असली तरी तिची तारीख प्रशासनाकडून अद्याप स्पष्ट झाली नाही.
कारशेड अद्याप नाहीच
मेट्रो मार्गिका तयार झाली असली तरी ठाण्यात निर्माण होणाऱ्या कारशेडचे काम अद्यापही झाले नाही. या कारशेडसाठी किमान वर्ष लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याबाबत एमएमआरएच्या सुत्रांना विचारले असता पावसामुळे विद्युत प्रवाह सुरु झालेला नाही. विद्युत प्रवाह सुरु झाल्यानंतर मेट्रो चाचणीची निश्चित तारीख स्पष्ट होईल असे त्यांनी स्पष्ट केले.
घोडबंदर मार्गावरून प्रवास करताना मेट्रो ट्रेन दिसते. परंतु ही केव्हा सुरु होईल हे सांगता येत नाही. निवडणूका जवळ आल्याने हा प्रकार तर सुरु नाही ना असा प्रश्न निर्माण होतो. – योगेश गांगुर्डे, प्रवासी.