Ambulance tariff news : ठाणे : रुग्णांना तात्काळ रुग्णालयात नेण्याचे काम रुग्णवाहिका करत असते. मात्र, रुग्णवाहिकेचे दरपत्रक तसेच रिक्षा, टॅक्सीप्रमाणे मीटर नसल्यामुळे चालक मनमानी रक्कम आकारतात. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची अडचणीच्या काळात आर्थिक पिळवणूक होते. ही एक गंभीर समस्या ठरू लागली आहे. रुग्णवाहिकांमधील मनमानी दर आकारणीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) राज्यातील सर्व रुग्णवाहिकांमध्ये दरपत्रक लावणे आणि मीटर बसवणे बंधनकारक करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे.
ठाणे शहरात रुग्णवाहिका चालकांकडून अवाजवी दर आकारणीच्या तक्रारी वाढत आहेत. अशा स्वरूपाच्या तक्रारी मनसे कार्यालयात येत असल्याचे सांगत रुग्णांच्या नातेवाईकांची अडचणीच्या काळात होणारी आर्थिक पिळवणूक ही एक गंभीर समस्या ठरत आहे. ही समस्या केवळ ठाण्यापूरती मर्यादित राहिली नसून ती संपूर्ण राज्यभरात आहे. त्यामुळे रुग्णवाहिकांचे प्रकार जसे की साधी, वातानुकूलित व कार्डियाक यानुसार दर निश्चित करून मीटर बसविण्यात यावेत, अशी मागणी मनसे ठाणे जिल्हा सचिव नैनेश बाळासाहेब पाटणकर यांनी परिवहन मंत्र्यांकडे केली.
चालक आणि रुग्ण यांच्यात वाद होणार नाही
नैनेश बाळासाहेब पाटणकर यांनी पत्रात परिवहन मंत्र्यांना उद्देशून म्हटले आहे की, “तुम्ही ठाणे शहराचे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आला असून तुम्हाला मंत्री पदाची जबाबदारी मिळाली आहे. म्हणून तुमच्याकडून या शहरातील नागरिकांच्या विशेष अपेक्षा आहेत. ठाणे शहरातील अनेक रुग्णांवाहिकांची दरपत्रक माहीत नसल्यामुळे लुबाडणूक आणि फसवणूक होणे ही नित्याची बाब झालेली आहे आणि हीच परिस्थिती संपूर्ण राज्यात ही आहे. आपल्या निदर्शनास मला हे आणून द्यायचे आहे की, आपण जर राज्यातील सर्व रुग्णवाहिकांना त्यांच्या दर्जा नुसार मीटर बसवून दिले तर कोणत्याही रुग्णाची आर्थिक फसवणूक होणार नाही आणि अवघड वेळेला रुग्णवाहिका चालक आणि रुग्ण यांच्यात कोणताही वाद होणार नाही.”
लाखो नागरिकांना दिलासा मिळेल
या विषयाची योग्य ती दखल घेऊन लवकरात लवकर रुग्णवाहिकांना दरपत्रक आणि मीटर बसवणे बंधनकारक करावे, अशी मागणी पाटणकर यांनी केली आहे. राज्यभरात यासंदर्भात एकसंध धोरण राबवले गेले, तर लाखो नागरिकांना दिलासा मिळेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान या संदर्भात उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांना पत्र दिले असून त्याची दखल घेत, त्यांनी लवकरच सर्व रुग्णवाहिकांमध्ये दरपत्रक लावण्याचे आदेश काढण्याचे मान्य केले आहे, असे पाटणकर म्हणाले.