ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्गावरील नितीन कंपनी उड्डाणपूलावर रिक्षाने प्रवास करणाऱ्या तरुणीच्या हातातील ७० हजार रुपये किमतीचा मोबाईल दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी खेचला. याप्रकरणी तरुणीने नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावर मोबाईल चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने या चोरट्यांवर कारवाई केव्हा होणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
माजिवडा येथे राहणारी २५ वर्षीय मुलगी वागळे इस्टेट भागातील एका कंपनीत कामाला आहे. दैनंदिन वापरासाठी तिच्याकडे ॲपल कंपनीचा आयफोन १५ हा मोबाईल होता. शनिवारी रात्री ती कामाहून घरी जाण्यास निघाली होती. तिने वागळे इस्टेट येथून रिक्षाने प्रवास सुरु केला. त्यावेळी तिच्या हातामध्ये मोबाईल होता. ती रिक्षाने नितीन कंपनी उड्डाणपूल येथे आली असता, दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी तिच्या हातातील मोबाईल खेचला. त्यानंतर दोघेही चोरटे दुचाकीवरून निघून गेले.
तरुणीने सुरुवातीला कापूरबावडी पोलीस ठाणे गाठले. परंतु हे प्रकरण नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने तिला तेथील पोलिसांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास सांगितले. तरुणीने नौपाडा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदविली. या तक्रारीनंतर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.