कल्याण : कल्याण डोंबिवली शहरे कचरा मुक्त करण्यासाठी पालिकेच्या सात प्रभागांमध्ये चेन्नई शहरातील स्वच्छता सुत्राप्रमाणे साफसफाईची कामे खासगी कंपनीकडून सुरू करण्यात आली आहेत. एका खासगी कंपनीच्या माध्यमातून हा स्वच्छतेचा कित्ता (पॅटर्न) राबविण्यात येत आहे. स्वच्छतेचा हा कित्ता सुरू होताच पालिका प्रशासनाने नागरिक, व्यापारी, वाणिज्य, व्यापारी संकुलांवरील उपयोगकर्ता कचरा शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. दुप्पट ते पाचपट ही वाढ करण्यात आली आहे.
मागील वर्षभरापासून कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत चेन्नई शहरात स्वच्छतेचे काम करणाऱ्या सुमित एल्कोप्लास्ट कंपनीचा स्वच्छतेचा प्रकल्प राबविण्याचे नियोजन कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाकडून करण्यात येत होते. या नियोजनाप्रमाणे गेल्या महिन्यात चेन्नई पॅटर्नची अंमलबजावणी पालिका हद्दीत सुरू होताच, प्रशासनाने शहरातील नागरिक, व्यापारी, वाणिज्य, व्यापारी संकुल, वाणिज्य, सभागृहांवरील कचरा निर्मिती करणाऱ्या वापरकर्त्यांवरील कचरा शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या महिन्यात प्रशासनाने पालिका परिक्षेत्रात लागू करण्यात आलेल्या २०२१ च्या उपविधींचा अवलंब करून शासकीय अधिनियमांतील तरतुदीप्रमाणे उपयोगकर्ता शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
२०२१ नंतर कडोंमपा हद्दीत उपयोगकर्ता कचरा शुल्क प्रशासनाने वाढविले नव्हते. पालिका हद्दीत दररोज सुमारे ६५० टन कचरा निर्मिती होते. चार वर्षानंतर प्रथमच उपयोगकर्ता शुल्क वाढविण्यात आले आहे. १०० किलोग्रॅम पेक्षा कमी कचरा तयार करणाऱ्यांना हा कर लागू असणार आहे. या दरवाढीला विविध क्षेत्रातील नागरिक, लोकप्रतिनिधींनी विरोध केला आहे.
जुने व नवीन दर
प्रती घरासाठी उपयोगकर्ता शुल्क जुन्या दराने ५० रूपये होते. नवीन दराने ते ७५ रूपये, दुकाने, दवाखाने जुना दर ६० रू., नवीन दर १२० रूपये, शोरुम, गोदामे जुना दर १२० रू., नवीन दर २४० रू., हाॅटेल, उपहारगृहांकडून १२० रूपये आकारले जात होते. नवीन दरात क्षेत्रफळाप्रमाणे २४० ते १४४० रूपयांपर्यंत दर आकारला जाणार आहे. लाॅजिंगसाठी जु. द. १६० रू., यापुढे लाॅजिंगच्या क्षेत्रफळाप्रमाणे ३२० ते १९२० रूपये आकारले जाणार आहेत. पन्नास खाटांच्या रुग्णालयांसाठी नवीन दराप्रमाणे २४० रू., पन्नासहून अधिक खाटांसाठी ३६० रूपये, शैक्षणिक संस्था, वसतीगृह, धार्मिक संस्था, शासकीय, निमशासकीय कार्यालये नवीन दर १२० रूपये, शुभमंंगल कार्यालय, चित्रपटगृह क्षेत्रफळाप्रमाणे नवीन दर दोन हजार रूपये ते सात हजार रूपये. खरेदीकेंद्रे, बहुपडदा चित्रपटगृहे क्षेत्रफळाप्रमाणे नवीन दर तीन हजार ते आठ हजार रूपये, फेरीवाले जुना दर १५० रू. नवीन दर २०० रूपये, प्रासंगिक दुकाने, आनंदमेळा, सत्संग, खाद्य महोत्सव, फटाके दुकानांना जुना दर पाच हजार रूपये होता. नवीन दराप्रमाणे त्यांना दहा हजार एकावेळचा दर लावण्यात आला आहे.
शासन निर्णय व अधिसूचनेप्रमाणे पालिका हद्दीतील घरे, आस्थापनांमधून कचरा संकलन करण्यासाठी उपयोगकर्ता शुल्क वसूल करण्याचे अधिकारी प्रशासनाला आहेत. त्याप्रमाणे या निर्णयाची अंमलबजावणी प्रशासन करत आहे. अभिनव गोयल आयुक्त.