ठाणे : उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर खडबडून जाग आलेल्या ठाणे महापालिका प्रशासनाने शहरातील बेकायदा बांधकामांपाठोपाठ आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या येऊरच्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील सर्व व्यावसायिक बांधकामांवर हातोडा मारण्याची तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून येथील सर्व अनधिकृत अनिवासी, व्यावसायिक बांधकामाचे महिनाभरात सर्वेक्षण करण्याचे तसेच याठिकाणी ध्वनीक्षेपक, फटाके, बँड वाजवण्यास प्रतिबंध करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.

ठाणे येथील येऊर परिसर हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग येतो. हा परिसर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात येतो. असे असले तरी या भागातील हाॅटेल, धाबे आणि बेकायदा बांधकामांचा मुद्दा सातत्याने चर्चेत येतो. येऊरमध्ये अनधिकृत व्यावसायिक बांधकामे आहेत. येथे जेवणावळी, विवाह, पार्टी आदी समारंभ होतात. अपरात्रीपर्यंत मोठ्या आवाजात, ध्वनीक्षेपक, बँड, फटाके वाजवले जातात. त्याचा परिणाम वन्यजीवांवर होतो. या सर्व गोष्टी पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रतिबंधित असतानाही येऊरमध्येही असे प्रकार सुरू आहेत. त्यावरून पालिका, वनविभाग आणि पोलिसांच्या कारभारावर सातत्याने टिका होत असून या टिकेनंतर आता हे प्रकार तातडीने थांबविण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे.

त्याचाच एक भाग म्हणून येऊरमधील सर्व अनधिकृत अनिवासी, व्यावसायिक बांधकामाचे महिनाभरात सर्वेक्षण करण्याचे तसेच याठिकाणी ध्वनीक्षेपक, फटाके, बँड वाजवण्यास प्रतिबंध करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. शहर विकास विभागाने येऊर येथे निवासी बांधकामांसाठी परवानगी दिली आहे. या बांधकामाचा वापर व्यावसायिक कारणासाठी होतो का याचीही पाहणी या सर्वेक्षणात करण्यात येणार आहे. सर्व अनधिकृत व्यावसायिक आस्थापना बंद करण्याच्या नोटीसा पाठविण्याचे निर्देशही आयुक्त राव यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत. येऊरमध्ये महापालिका, वनविभाग आणि पोलीस यांची संयुक्त कारवाई करण्यात येणार आहे.

आठ टर्फवर कारवाई

येऊर येथील अनधिकृत टर्फवर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई सुरू आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी सोमवारी दुपारी महापालिकेच्या माजिवडा येथील नागरी संशोधन केंद्रात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस, पोलिस उपायुक्त प्रशांत कदम, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे उपसंचालक प्रदीप पाटील, परिक्षेत्र वन अधिकारी मयुर सुरवसे, विधी अधिकारी मकरंद काळे, याचिकाकर्ते रोहित जोशी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत येऊर येथील १० अनधिकृत टर्फपैकी ८ टर्फवर कारवाई झाली आहे तर, दोन टर्फ मालकांनी १० जुलैपर्यंत स्वत:हून टर्फ काढण्याचे मान्य केले आहे. त्यांनी ते काढले नाहीतर महापालिका त्यावरही कारवाई करणार आहे. या टर्फशिवाय आणखी २ अनधिकृत टर्फची माहिती याचिकाकर्ते रोहित जोशी यांनी या बैठकीत दिली. त्यापैकी एकावर महापालिकेने अनधिकृत बांधकामाच्या विरोधातील विशेष मोहिमेत कारवाई केली आहे. तर, दुसऱ्या टर्फवर तत्काळ कारवाईचे आदेश आयुक्त राव यांनी दिले. तसेच, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात एकही अनधिकृत टर्फ सुरू ठेवता येणार नाही, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येऊरसाठी समन्वय समिती स्थापन होणार

येऊर या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात विविध समस्या आहेत. या क्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी येऊरचे सर्व यंत्रणांमार्फत सुनियोजित व्यवस्थापन व्हावे यासाठी महापालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती स्थापन करण्याची सूचना रोहित जोशी यांनी केली आहे. त्यानुसार, महापालिका, वन विभाग, पोलिस, महसूल, स्वयंसेवी संस्था यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती लवकरच स्थापन करण्यात येईल, असे आयुक्त राव यांनी सांगितले.