Thane municipal corporation : ठाणे : ठाणे महानगरपालिका आरोग्य विभाग आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘उपमुख्यमंत्री – निरोगी महिला’ ( Deputy Chief Minister – Healthy Women’s Campaign ) अभियानाला ठाणेकर महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जून ते ऑगस्ट या कालावधीत घेण्यात आलेल्या १० आरोग्य शिबिरांमध्ये एकूण १५३८ महिलांनी सहभाग नोंदवला असून, विविध तपासण्यांसह त्यांना आरोग्यविषयक सल्लाही देण्यात आला आहे.
या मोहिमेमध्ये रोटरी क्लबच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसह ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील डॉक्टर, परिचारिका, आशा वर्कर्स यांचा मोलाचा सहभाग राहिला. प्रत्येक शिबिरात सरासरी १०० ते १२५ महिलांची नोंदणी झाली असून, मुंब्रा विभागातील एका शिबिरात एकाच दिवशी तब्बल २१६ महिलांची तपासणी करण्यात आली.
या तपासणी शिबिरांमध्ये विशेषतः गर्भाशयाच्या कॅन्सरचे निदान करणारी पॅप्समिअर तपासणी करण्यात आली. त्यात २० महिलांमध्ये संशयास्पद लक्षणे आढळून आल्याने त्यांच्या नमुन्यांची पुढील तपासणी केली जात आहे. सध्या तरी कोणत्याही महिलेमध्ये कॅन्सरचे निदान झाल्याचे स्पष्ट झालेले नाही.
संवाद शिबिरे आणि आरोग्य जनजागृती
महिलांमध्ये निरोगी जीवनशैलीविषयी जागरूकता वाढवण्यासाठी एकूण २० संवाद शिबिरे आयोजित करण्यात आली होती. या शिबिरांमध्ये १५०० पेक्षा अधिक महिलांनी सहभाग घेतला. याशिवाय सर्व १५३८ महिलांची हिमोग्लोबिन व शुगर तपासणी देखील करण्यात आली आहे.
एचपीव्ही लसीकरण मोहीम
९ ते १४ वयोगटातील १५० मुलींचे एचपीव्ही लसीकरण पूर्ण झाले असून, यामध्येही पालिकेच्या शाळांचा सक्रिय सहभाग होता. गणेशोत्सव सुट्टीनंतर ८ सप्टेंबरपासून पुन्हा एकदा शाळांमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून, यामध्ये किमान १००० मुलींच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
आरोग्य विभागाची नियोजनबद्ध आखणी
या अभियानाबाबत माहिती देताना ठाणे महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील म्हणाले, “ठाणे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून ‘उपमुख्यमंत्री – निरोगी महिला अभियान’ राबविले जात आहे. या अभियानाची आरोग्य विभागाकडून नियोजनबद्ध आखणी करण्यात आली आहे. महिलांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, त्यांनी तपासण्या करून घेतल्या आहेत. तसेच, गणेशोत्सवानंतर ७ सप्टेंबरपासून पालिकेच्या शाळांमधील मुलींच्या लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे.”