Ganesh utsav 2025 : ठाणे : ठाणे महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी यांनी यंदा गणेशोत्सवासाठी साकारलेली सुबक गणेशमूर्ती चर्चेचा विषय ठरली आहे. कोणत्याही साच्याविना आणि पूर्णपणे शाडू मातीचा वापर करून त्यांनी ही आकर्षक मूर्ती तयार केली आहे. कार्यालयीन कामकाज आटोपल्यानंतर दररोज रात्री १० ते २ या वेळेत मेहनत घेऊन त्यांनी महिनाभरात ही दीड फूट उंचीची मूर्ती साकारली आहे.
ठाणे महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी यांच्याकडे सचिव, आरोग्य, माहिती व जनसंपर्क विभागाची जबाबदारी आहे. ते शासनाच्या सेवेतून ठाणे महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आले असून ते सध्या लुईसवाडी परिसरात महापालिकेच्या निवासस्थानात राहतात. त्यांना चित्रकला व शिल्पकलेची विशेष आवड असून ते कार्यालयीन कामानंतर ही कला जोपासण्याचे काम करतात. यातूनच त्यांनी कोणत्याही साच्याविना आणि पूर्णपणे शाडू मातीचा वापर करून त्यांनी ही आकर्षक गणेश मूर्ती तयार केली आहे. बिरारी यांनी गणेशोत्सवासाठी स्वतः च्या हाताने शाडू मातीची साकारलेली गणेशमूर्ती केवळ एक कलाकृती नाही, तर त्यांच्या अथक परिश्रम, निस्सीम श्रद्धा आणि कलाप्रेमाची साक्ष आहे. ही सुबक मूर्ती पालिकेत चर्चेचा विषय ठरली आहे.
गणेशमूर्ती बनवण्याचा छंद कसा लागला?
सहा ते सात वर्षांपूर्वी त्यांची मुले मातीने गणेश मूर्ती तयार करत होते. मुलांनी बनवलेली थोडीशी ओबडधोबड मूर्ती पाहून त्यांनी स्वतः प्रयत्न केला आणि तिथूनच मूर्ती घडवण्याचा त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यांना चित्रकला आणि शिल्पकलेची विशेष आवड असून, त्यातूनच त्यांनी मूर्ती घडवण्यातील कौशल्य विकसित केले. यंदा साकारलेल्या मूर्तीला त्यांनी सुंदर रंगरंगोटीही केली असून, ती मूर्ती पाहताना ही एखाद्या प्रशिक्षित मूर्तिकाराने साच्याच्या साहाय्याने बनवलेली असावी, असा भास होतो.
अशी तयार केली मूर्ती
दिवसभर महत्त्वाच्या शासकीय जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर रात्री १० ते पहाटे २ या वेळेत महिनाभर सातत्याने मेहनत घेऊन बिरारी यांनी सुमारे दीड फूट उंचीची गणेश मूर्ती घडवली. झोपेचा त्याग करून, पूर्ण एकाग्रतेने त्यांनी आपल्या हातांनी गणपतीची मूर्ती साकारली. त्यांनी आपल्या व्यस्त शासकीय जबाबदाऱ्यांनंतर उरलेल्या वेळेत, केवळ कलेच्या प्रेमातून आणि श्रद्धेने शाडूमातीची देखणी गणेशमूर्ती साकारली आहे. बिरारी यांचा हा उपक्रम केवळ एक छंद नाही, तर शासकीय जबाबदाऱ्यांमध्येही कला जोपासता येते, याचा आदर्श उदाहरण आहे.
ठाणे महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी यांनी यंदा गणेशोत्सवासाठी साकारलेली सुबक गणेशमूर्ती चर्चेचा विषय ठरली आहे. कोणत्याही साच्याविना आणि पूर्णपणे शाडू मातीचा वापर करून त्यांनी ही आकर्षक मूर्ती तयार केली आहे. https://t.co/2jrmCKw8Ui #Ganeshotsav2025 #Maharashtra #Thane pic.twitter.com/Mr4UyyRO0O
— LoksattaLive (@LoksattaLive) September 4, 2025
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या दिशेने हे एक सकारात्मक पाऊल ठरत आहे.पर्यावरणपूरकतेचा संदेशही मूर्ती महापालिकेच्या गणेशोत्सवात मांडण्यासाठी तयार करण्यात आली होती, मात्र जागेअभावी ती त्यांच्या कार्यालयात ठेवण्यात आली. यापूर्वी त्यांनी बनवलेल्या मूर्ती पूजेसाठी नागरिकांना दिल्या आहेत. उमेश बिरारी यांचा हा उपक्रम पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल असून, त्यांनी शासकीय जबाबदाऱ्या सांभाळत आपली कला जोपासण्याचा सुंदर आदर्श समाजापुढे ठेवला आहे. बिरारी म्हणाले, “मूर्ती तयार करण्यासाठी वेळ कमीच मिळाला. थोडा आणखी वेळ मिळाला असता तर ही मूर्ती आणखी आकर्षक आणि सुबक करू शकलो असतो.”