ठाणे महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेनेची सत्ता असलेल्या काही पालिका पदाधिकाऱ्यांनी हातभार लावावा म्हणून एक अलिखित आणि अघोषित असे फर्मान शिवसेनेच्या जिल्हा पातळीवरील ज्येष्ठांनी स्थानिक पालिका पदाधिकाऱ्यांना धाडले असल्याचे समजते. ज्येष्ठांच्या आदेशावरून ठाणे पालिकेच्या निवडणूक यज्ञ‘कुंडात’ कल्याण-डोंबिवली पालिका पदाधिकाऱ्यांचा हातभार लागावा. आपल्या हातून त्यात काही ‘समीधा’ पडाव्यात म्हणून पालिका पदाधिकाऱ्यांनी जोरदार हालचाली सुरू केल्याचे चित्र आहे.

कल्याण- डोंबिवली पालिकेच्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ‘समीधां’ची जुळवाजुळव कशी आणि कोठून करायची यासाठी चाचपणी सुरू केली असल्याची पालिकेतील चर्चा आहे. कल्याण-डोंबिवली पालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. मालमत्ता कराची ३१६ कोटीची वसुली, नगररचना, स्थानिक संस्था कर अशा पालिकेच्या बेतासबात महसूल स्रोतांवर पालिकेचा डोलारा सध्या रडतखडत सुरू आहे. पालिका कर्मचाऱ्यांच्या दरमहा पगाराची जुळवाजुळव करताना अधिकाऱ्यांना घाम फुटत आहे. गेल्या काही वर्षांतील विकास कामांचे दायित्व सुमारे ४०० कोटीपर्यंत पोहचले आहे.अशी हाततोंडाची मिळवणी करून कल्याण- डोंबिवली पालिकेचा कारभार सुरू असून सर्वपक्षीय पालिका पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन हा सगळा जुळवाजुळवीचा खेळ पालिकेत सुरू असल्याची चर्चा आहे.

६८७ कोटींच्या कामांना मंजुरी ?

कल्याण-डोंबिवली पालिकेमार्फेत  ६८७ कोटीची विकास कामे प्रशासनाने काढली आहेत. शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत हे विषय मंजुरीला आणले आहेत. विकास कामांचे विषय सर्वसाधारण सभेत धडाधड मंजूर करून घ्यायचे. कामांच्या झटपट निविदा काढून कामांचे फक्त आदेश देऊन कामे दिल्याचा देखावा निर्माण करायचा आणि या माध्यमातून उभारलेला निधी ठाण्याच्या निवडणूकीत खर्च करायचा, अशी चर्चा आहे.