ठाणे – पिंपरी चिंचवड महापलिकेतील ‘दिव्यांग भवन फाऊंडेशन’ च्या धर्तीवर ठाणे महापालिकेत ‘दिव्यांग फाऊंडेशन’ ही स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून या संबंधीच्या प्रस्तावास ठाणे महापालिकेच्या प्रशासकीय सभेने मान्यता दिल्याने कंपनी स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील अपंगांना विविध सोयीसुविधा तसेच उपचार मिळावा तसेच सामाजिक दायित्व, अनुदानांच्या माध्यमातून अपंगांच्या विकासाकरिता काम करणे, या उद्देशातून कंपनीची स्थापना करण्यात आली आहे.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अपंग व्यक्तींना विविध प्रकारच्या सोयी सुविधा आणि उपचार उपलब्ध करून देण्यासाठी एक स्वतंत्र अस्तित्व असलेली संस्था निर्माण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. यानुसार ठाणे महानगरपालिका, आनंद दिव्यांग कल्याण फाऊंडेशन किंवा ठाणे महानगरपालिका, आनंद दिव्यांग फाऊंडेशन या नावाने कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. त्याची स्थापना कंपनी कायदा २०१३ च्या कलम ८ नुसार करुन ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालवली जाणार आहे. हि कंपनी धर्मादाय अथवा चॅरिटेबल सोसायटी या पद्धतीने सुद्धा कामकाज करेल, असे पालिकेने प्रस्तावात म्हटले आहे. या संस्थेचे नियंत्रण हे कंपनीच्या संचालक मंडळाचे मार्फत होणार आहे. तर, त्यांना मदत करण्याकरिता कंपनी एक सल्लागार समितीची स्थापना करून त्याच्यामध्ये विविध विषयातील तज्ज्ञांना सभासदत्व दिले जाणार आहे. सल्लागार समिती ही कंपनीच्या संचालक मंडळाला त्यांचे अहवाल आणि त्यांच्या सूचना देऊ शकतात आणि त्यानुसार कंपनीचे संचालक मंडळ त्यावर योग्य तो निर्णय घेऊन या निर्णयांची अंमलबजावणी करून परिणामकारकरीत्या घडवून आणू शकतात, असे पालिकेने प्रस्तावात म्हटले आहे.
कंपनी स्थापन करण्यामागची कारणे
ही एक स्वतंत्र अस्तित्व असलेली संस्था आहे. त्यामुळे तीच्या दैनंदिन कामकाजामध्ये महापालिकेचा हस्तक्षेप कमीत कमी होऊ शकतो. तसेच संस्था स्वतःच्या कार्यासंबंधी स्वतः निर्णय घेऊ शकत असल्यामुळे काही अनावश्यक हस्तक्षेप टाळता येऊ शकतात. ही संस्था वेगळे अस्तित्व असलेली संस्था असल्याकारणामुळे या संस्थेस आयकर कायद्यानुसार आयकरातून सूट मिळू शकते. ही संस्था महापालिकेच्या विद्यमाने स्थापन झालेली असल्याकारणाने तिला कंपन्यांचे सामाजिक दायित्व मिळवता येणे सोपे जाते. ही संस्था आपले स्वतःचे अंदाजपत्रक तयार करून त्यानुसार महापालिकेकडून योग्य ती रक्कम अनुदान स्वरूपात मिळवू शकते आणि त्यानुसार तिचे कामकाज चालू शकते.
संस्थेचे कामकाज स्वतंत्रपणे चालत असल्यामुळे ही संस्था अपंगांच्या विकासावरती पूर्ण लक्ष केंद्रित करून आपले कामकाज परिणामकारकरीत्या आणि योग्य त्या क्षमतेने करू शकते. या संस्थेच्या कामकाजामध्ये अपंगांसाठी कार्यरत असलेल्या संस्थांचा तसेच अपंग संघटनांचा तसेच अपंगांवर उपचार करणाऱ्या विविध व्यावसायिकांचा अंतर्भाव अतिशय परिणामकारकरीत्या घेता येतो आणि त्यामुळे दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांना प्राधान्य मिळू शकते. ही संस्था वेगवेगळ्या संस्थांसोबत करार करू शकते आणि त्यानुसार त्याचा फायदा दिव्यांग व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकते. ही संस्था स्वतःचे संशोधन गृह तयार करून त्यामध्ये अपंगांसाठीचे वेगवेगळ्या संशोधित वस्तूचे उत्पादन करू शकते तसेच वेगवेगळ्या औषधांवरती संशोधन तसेच वेगवेगळ्या उपचारांवरतीचे संशोधन करू शकते. त्यासाठी एक वेगळे अंदाजपत्रक करून घेऊ शकते तसेच त्यावर योग्य ते नियंत्रण ठेवून त्यामधून समाजामध्ये वेगळे परिमाण घडवून आणण्याची क्षमता स्वतःमध्ये आणू शकते. अपंगांसाठी लागणाऱ्या विविध योजना तसेच त्यांना देण्यात येणारे लाभाचे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाबरोबर सुसूत्रीकरण करून ते योग्य त्या व्यक्तीस पोहोचत आहेत याची खातरजमा करता येईल. ही संस्था अपंगांसाठी काम करणाऱ्या विविध तज्ज्ञ व्यक्तीबरोबर सामंजस्य करार करून त्यांना देण्याविषयीच्या उपचारांमध्ये भरीव गुणात्मक आणि संख्यात्मक वाढ करून समाजामध्ये दिव्यांगांना स्वतःचे पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहित करू शकते, असे या कंपनी स्थापनेमागचा फायदा असल्याचे पालिकेने म्हटले आहे.
कंपनीचे संचालक मंडळ असे असेल
कंपनीचे संचालक मंडळ हे आठ जणांचे असणार आहे. यात अध्यक्ष पदावर आयुक्त, उपाध्यक्ष पदावर अतिरिक्त आयुक्त-२, सदस्यांमध्ये समाज विकास विभागाचे उपायुक्त, समाज विकास अधिकारी, महापालिकेचे महापौर, महापालिकेचे उपमहापौर, महापालिकेचे स्थायी समिती सभापती, महापालिकेचे विरोधी पक्ष नेता यांचा समावेश असेल.