ठाणे : ठाणे महापालिकेच्या आरोग्य केंद्रांत औषधांचा तुटवडा निर्माण होऊ नये तसेच मुदत संपलेल्या औषधांच्या साठ्याचे वितरण होऊ नये यासाठी आरोग्य विभागाने पाऊले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून औषध वितरण आणि मुदत संपलेली औषधे यांची माहिती तात्काळ मिळविण्यासाठी एक संगणकीय प्रणाली विकसित केली असून त्याद्वारे औषध वितरणाचे व्यवस्थापन आणि त्यावर देखरेख ठेवली जाणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २६ लाखांच्या पुढे गेली आहे. त्यापैकी ५२ टक्के नागरिक हे झोपडी आणि चाळीमध्ये राहतात. ठाण्यातील विद्यमान ३३ आरोग्य केंद्र आणि ६ प्रसुतीगृह आहेत. या आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांवर मोफत प्राथमिक दवाउपचार करण्यात येतात. या केंद्रावर येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते. एकूणच आरोग्य सुविधेसाठी महत्वाची भूमिका बजावत असलेल्या आरोग्य केंद्रांना पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मागणीनुसार औषधांचा पुरवठा करण्यात येतो. पुर्वीच्या व्यवस्थापनानुसार औषध पुरवठ्यासाठी बराच वेळ वाया जायचा आणि यामुळे काही वेळेस आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा निर्माण व्हायचा. काही वेळेस नजरचुकीने मुदत संपलेली औषधेही वितरित होऊन त्यावरून टिका होते, अशी बाब आरोग्य विभागाच्या निदर्शनास आली आहे. यामुळे आरोग्य विभागाने आता संगणकीय प्राणालीद्वारे औषधांचे वितरण करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी लवकरच सुरू केली जाणार असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. प्रसाद पाटील यांनी दिली.

यापुर्वीची औषध पुरवठ्याची पद्धत

ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील आरोग्य केंद्रांना औषधांचा पुरवठा करण्यात येतो. औषधांच्या मागणीचे पत्र आरोग्य केंद्रांकडून आरोग्य विभागाला पाठविण्यात येते. त्यानंतर आरोग्य विभाग ती औषधे आहेत की नाही, याची तपासणी करते आणि त्यानंतर त्याचे वितरण करते. मात्र, या प्रक्रीयेत दोन ते तीन दिवस जातात. यामुळे आरोग्य केंद्रात काही वेळेस तुटवडा निर्माण होतो. तसेच काहीवेळेस आरोग्य केंद्राकडून औषधांचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी औषध साठा असतानाही त्याची मागणी केली जाते. त्यामुळे ज्याठिकाणी गरज असते त्याठिकाणी साठा उपलब्ध करून देणे शक्य होत नाही. तसेच औषधांचे किती वाटप झाले याची नोंद रजीस्टरवर केली जाते. त्यामुळे रजीस्टर तपासल्याशिवाय, औषध साठ्यांच्या वितरणाची माहिती उपलब्ध होत नाही. अनेकदा औषधांची मुदत संपुष्टात येण्यासाठी काही दिवस शिल्लक असतात, त्याबाबतही माहिती उपलब्ध नसते आणि ती वितरित झाल्यावर पालिकेवर टिका होते. यामुळेच औषध वितरणावर ऑनलाईनद्वारे देखरेख ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवीन पद्धत

ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचा पदभार हाती घेतल्यानंतर डाॅ. प्रसाद पाटील यांनी प्रशासकीय कामकाजात अनेक बदल करण्यास सुरुवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून औषध वितरणावर ऑनलाईनद्वारे देखरेख ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आरोग्य केंद्रांना आता ऑनलाईनद्वारे औषधांची मागणी करावी लागणार असून त्याचबरोबर वाटपाची नोंदही ठेवावी लागणार आहे. त्यामुळे किती औषधे दिली, त्याचे किती वाटप झाले, याची माहिती तात्काळ पालिकेला उपलब्ध होणार आहे. तसेच मुदत संपुष्टात आलेल्या औषधांची माहिती तात्काळ संदेशद्वारे मिळणार असल्याने ती वितरित होणार नाहीत, असा दावा आरोग्य विभागाने केला.