उल्हासनगरः उल्हासनगर शहरात खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झालेली असताना वाहनचालकांना त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे हे खड्डे भरण्याचे काम सुरू करण्यात यावे अशी मागणी केली जात होती. अखेर महापालिका प्रशासनाने रस्त्यांवरील खड्डे भरण्यास सुरूवात केली आहे. सध्या पालिका प्रशासनाने मास्टिक तंत्राच्या सहाय्याने खड्डे भरण्याचे काम सुरू केले आहे. यामुळे दिर्घकाळ रस्ते चांगले राहतील असा पालिकेचा दावा आहे.
उल्हासनगर शहरातील रस्त्यांची स्थिती दिवसेंदिवस दयनीय होते आहे. अंबरनाथहून उल्हासनगर शहरात प्रवेश करताच प्रवेशद्वारापासून असमान रस्त्यांना सुरूवात होते. फॉलोवर लाईन चौकापासून खराब रस्त्यांची मालिका सुरू होते. उजवीकडे शासकीय मध्यवर्ती रूग्णालय ते थेट कॅम्प दोनच्या पं. नेहरू चौकापर्यंत रस्त्याची स्थिती बिकट होती. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने रस्त्यांवरून प्रवास करताना वाहनचालकांना त्रासाला सामोरे जावे लागत होते. अनेकदा पाऊस पडत असताना खड्ड्यांत पाणी साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे अनेक लहान अपघातही होत होते. शहराच्या विविध भागांमध्ये खड्ड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. उड्डाणपूलासह सर्वच डांबरी रस्ते, जोडरस्ते खड्ड्यांनी व्यापल्यानेे नागरिक आणि रिक्षाचालकांना त्याचा मोठा फटका बसत होता. अनेकदा कल्याण बदलापूर राज्यमार्गावर कोंडीही होत होती. त्यामुळे हे खड्डे बुजवण्याची मागणी केली जात होती.
याच विषयावर स्थानिक आमदार कुमार आयलानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत याबाबत तातडीने आदेशाची मागणीही केली होती. शहरात समाज माध्यमांवर या खड्ड्यांवरून पालिका आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष्य केले जात होते. खड्ड्यांवरचे रॅप उल्हासनगरात प्रसिद्ध झाले होते. अखेर पावसाचा जोर ओसरताच उल्हासनगर महापालिका प्रशासनाने शहरातील खड्डे भरण्याचे काम सुरू केले आहे. शहरात मध्यरात्री वाहतुक कमी झाल्यानंतर खड्डे भरले जात आहेत. मास्टिंग या तंत्राचा वापर करून खड्डे भरण्यास सुरूवात करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
या भागात काम सुरू
उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रूग्णालयाच्या मुख्य चौकात, फॉलोवर लाईन, पं. नेहरू चौक या रस्त्यावर, फर्निचर बाजार, प्रेस बाजार या भागातील रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले असून बहुतांश भागात खड्डे भरले गेल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. धीरज चव्हाण यांनी दिली आहे. येत्या काही दिवसात उर्वरित रस्त्यांवरचे खड्डे भरण्याचे कामही पूर्ण होईल, असेही डॉ. चव्हाण म्हणाले.