ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षात मोठ्याप्रमाणात नागरीकरण झाले आहे. शहराची लोकसंख्या २६ लाखांच्या पुढे गेली आहे. त्याचबरोबर शहरात वाहनांच्या संख्येतही वाढ झाली आहे. यातूनच गेल्या काही वर्षांपासून ठाणे महापालिका रस्ते रुंदीकरण मोहीम राबवित आहे. असे असले तरी शहरात पुरेशी पार्किंग ( Parking ) सुविधा नाही. यामुळे पालिका प्रशासनाने पार्किंग सुविधा निर्माण करण्यास सुरुवात केली असून अशाच एका प्रस्तावास ठाणे महापालिकेच्या प्रशासकीय स्थायी समितीने मंजुरी दिल्याने ठाणेकरांना शहरातील दोन उड्डाणपुलांखाली पार्किंग सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यातून पालिकेला वर्षाकाठी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराला लागूनच ठाणे शहर आहे. ठाणे शहराच्या एक बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तर दुसऱ्या बाजूला मोठा खाडी किनारा लाभला आहे. शिवाय, ३६ तलाव आणि मोठा हरित पट्टाही शहरात आहे. ठाणे शहरात मेट्रो, कोस्टल रोड, ठाणे ते बोरिवली भुयारी मार्ग आणि अंतर्गत मेट्रो असे प्रकल्प उभे राहत आहेत. येथे मोठमोठी गृहसंकुले उभी राहिली असून आजही शहरात गृहसंकुले उभारणीची कामे सुरू आहेत. निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या ठाणे शहरातील घरांना नागरिक पसंती देत आहेत. यामुळे गेल्या काही वर्षात मोठ्याप्रमाणात नागरीकरण झाले आहे. शहराची लोकसंख्या २६ लाखांच्या पुढे गेली आहे. त्याचबरोबर शहरात वाहनांच्या संख्येतही वाढ झाली आहे. यातूनच गेल्या काही वर्षांपासून ठाणे महापालिका रस्ते रुंदीकरण मोहीम राबवित आहे. असे असले तरी शहरात पुरेशी पार्किंग सुविधा नाही.
वाहतुक कोंडीत पडते भर
ठाणे महापालिका क्षेत्रात पार्किंगची पुरेशी व्यवस्था नाही. यामुळे रस्त्याच्या कडेला दुचाकी आणि चार चाकी वाहन उभे करण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरू झाले आहेत. अशा बेकायदा पार्किंगमुळे रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी होते. अशा वाहनांवर ठाणे वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. परंतु या कारवाईवरून नागरिक आणि पोलिसांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवतात. शहरातील नागरिकांना पार्किंगची पुरेशी सुविधा उपलब्ध करून द्या आणि मगच अशा प्रकारची कारवाई करा असा सूर नागरिकांकडून लावण्यात येतो. हीच बाब लक्षात घेऊन पालिकेने आता शहरात विविध ठिकाणी पार्किंगची सुविधा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.
पार्किंग सुविधेसाठी प्रयत्न
ठाणे महापालिकेने गेल्या काही वर्षांपासून पार्किंग सुविधा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या बाजूला असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जागा, नौपाडा येथील शाहु मार्केटच्या नवीन इमारतीत पार्कींगची सुविधा निर्माण करण्यात येणार असून यासंबंधीचा निर्णय पालिका प्रशासनाने यापूर्वीच घेतला आहे. त्यापाठोपाठ आता शहरातील सर्वात गर्दीचे ठिकाण असलेल्या दोन उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत पार्कींगची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे.
पालिकेला मिळणार लाखोंचे उत्पन्न
दोन उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत पार्कींगची सुविधा निर्माण करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी म्हणजेच २९ ऑगस्ट २०२३ रोजी निविदा काढण्यात आली होती. त्यानंतर टेक्नीकल बीडही उघडण्यात आले होते. त्यानंतर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने हा प्रस्ताव कागदावरच राहिला होता. दरम्यान, आता या निविदा अंतिम करण्यात येऊन ठेकेदार निश्चित करण्यात आला असून या प्रस्तावास ठाणे महापालिकेच्या प्रशासकीय स्थायी समितीने नुकतीच मान्यता दिली आहे. ठाणेकरांना शहरातील दोन उड्डाणपुलांखाली पार्किंग सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यातून पालिकेला वर्षाकाठी ५६ लाख ८८ हजार उत्पन्न ठेकेदाराकडून मिळणार आहे.
या उड्डाणपूलांखाली असेल पार्किंग सुविधा
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कापूरबावडी आणि माजिवाडा नाका येथील उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेमध्ये पार्किंग सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. सध्या कापुरबावडी आणि माजिवडा उड्डाणपुलाखाली मोकळ्या जागेतून वाहनांची वाहतूक सुरु आहे. तर काही ठिकाणी भंगार गोळा करुन ठेवण्यात आले आहे. माजिवडा उड्डाणपुलाखालून छोट्या वाहनांची वाहतूक सुरु असल्याने मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा ताण काही अंशी कमी होतांना दिसत आहे. परंतु सांयकाळच्या सुमारास या भागात वाहनांचा भार वाढून कोंडी होते. आता याच उड्डाणपुलाखाली पार्कींगची व्यवस्था करण्यात येणार आहे.