ठाणे : ठाणे शहरातील बेकायदा बांधकामांचा ऐरणीवर आलेला मुद्दा, अधिकाऱ्यांच्या न्यायालयीन चौकशा सुरु असतानाच, बुधवारी मध्यरात्री मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे आणि त्यांच्या सहकाऱ्याला लाचेप्रकरणी ताब्यात घेतले आहे. पाटोळे यांची ठाणे महापालिकेच्या मुख्यालयात तब्बल पाच तास चौकशी सुरु होती. त्यानंतर एसीबीने त्यांना ताब्यात घेतले. पाटोळे यांना ताब्यात घेण्यापूर्वी ठाणे महापालिकेत काही नागरिक, पत्रकारांनी गराडा घातला होता. पाटोळेंना ताब्यात घेताच, त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यांचा निषेध म्हणून फुलांच्या पाकळ्या त्यांच्या अंगावर फेकण्यात आल्या. तसेच एकाने पेढे वाटले.
दरम्यान, पाटोळे यांच्यावरील कारवाईनंतर समाजमाध्यमांवरही महापालिकेच्या कारभाविषयी टिका होऊ लागली आहे. ठाणे महापालिकेत पाटोळे यांच्या प्रमाणे आणखी काही भ्रष्ट अधिकारी असल्याची चर्चा सत्ताधारी-विरोधी पक्षातील नेते, सामान्य नागरिक करत आहेत.
ठाणे महापालिकेत शंकर पाटोळे हे अतिक्रमण नियंत्रण विभागात उपायुक्त पदावर कार्यरत आहेत. बुधवारी ठाणे महापालिकेचा ४३ वा वर्धापनदिन साजरा केला जात होता. त्यामुळे महापालिकेच्या पाचपाखाडी येथील मुख्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व दालन, बाहेरील परिसर फुलांच्या तोरणांनी सजवले होते.
महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी वर्धापनदिन असल्याने सायंकाळी कामकाज आटोपून कार्यालयात बसले होते. पाटोळे हे देखील बुधवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास त्यांच्या दालनात असताना अचानक मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक त्यांच्या दालनाबाहेर पोहचले. अवघ्या काही मिनीटांत हे वाऱ्यासारखे पसरल्यानंतर पाटोळे यांच्या दालनाबाहेर पत्रकारांचा, महापालिका कर्मचाऱ्यांचा, ठाण्यातील काही नागरिकांचा गराडा पाहायला मिळाला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बंद दाराआड पाटोळे यांची चौकशी केली. पाच तास त्यांची चौकशी केल्यानंतर पथकाने त्यांना ताब्यात घेतले.
कोणी पेढे वाटले तर कोणी घोषणा दिल्या
बुधवारी रात्री उशीरा पाटोळे आणि त्यांच्या एका सहकाऱ्याला घेऊन मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक बाहेर पडू लागले. त्यावेळी जमलेल्या काही नागरिकांनी पाटोळे यांच्याविरोधात घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली. तर काहींनी त्यांना ताब्यात घेतले म्हणून त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी फुलांच्या पाकळ्या त्यांच्या दिशेने फेकल्या. तर एकाने पेढे वाटले.
समाजमाध्यमांवर चर्चा
ठाणे महापालिकेच्या वर्धापनदिनाच्या दिवशीच ही कारवाई झाल्याने नागरिकांकडून समाजमाध्यमांवर महापालिकेच्या कारभाराविषयी टीका केली जात आहे. पाटोळे यांच्याप्रमाणे महापालिकेत काही कथित भ्रष्टाचारी अधिकारी असल्याचा दावा केला जात आहे. पाटोळे यांच्याप्रमाणे इतरांवरही कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे.