आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने वनमंत्री गणेश नाईक यांची नुकतीच ठाणे विभागाचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यात भाजपने शिंदे यांचे कडवे टीकाकार म्हणून ओळखले जाणारे नाईक यांच्याकडे ही जबाबदारी सोपवून शिंदे यांच्या पक्षाला एकप्रकारे इशाराच दिला आहे.

स्वत: शिंदे गेल्या सहा महिन्यांपासून राज्यभर राजकीय दौरे करत आहेत. मुंबई, ठाण्यातही त्यांनी संघटनेच्या बैठकांवर जोर लावला आहे. या सभा, बैठकांमधून शिंदे यांनी आतापर्यंत महायुतीचाच सूर लावलेला दिसतो. असे असले तरी नाईक, संजय केळकर आणि कल्याण, डोंबिवलीत रवींद्र चव्हाण यांचे आक्रमक राजकारण पाहता शिंदे यांना भाजप सहज, सोपी वाट करून देणार नाही हे आता स्पष्टपणे दिसू लागले आहे.

ठाणे जिल्ह्यात गेल्या आठवड्यात महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडल्या. बुधवारी सायंकाळी उशिरा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या निवडणूक प्रभारी आणि प्रमुखांची यादी जाहीर केली. यामध्ये गणेश नाईक आणि संजय केळकर या दोन्ही नेत्यांकडे महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली. नाईक हे अलीकडच्या काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कडवे विरोधक म्हणून ओळखले जातात.

मंत्री होताच शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी येथील मतदारसंघात जात ‘फक्त कमळ’ अशी घोषणा त्यांनी सर्वप्रथम दिली. आमदार केळकर यांच्या ठाण्यातील राजकारणाची आखणीच मुळी महापालिकेतील भ्रष्टाचारविरोधी मुद्दयांच्या पायावर उभी आहे. महापालिकेतील भ्रष्टाचार, अनियमितता, बेकायदा बांधकामे यासारख्या मुद्द्यांवर केळकर प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे शिंदे यांच्या पक्षाला धारेवर धरत असतात. अशा या दोन नेत्यांकडे ठाणे, नवी मुंबईसारख्या मोठ्या महापालिका निवडणुकांच्या तयारीची जबाबदारी सोपवून भाजपने शिंदे यांना सरळसरळ डिवचले आहे.

नवी मुंबईत तर नाईक आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये विस्तवही जात नाही. सिडकोकडून केले जाणारे भूखंडवाटप, आरक्षण बदल, पाणीवाटपाच्या मुद्द्यांवर आतापर्यंत नाईक यांनी शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये नाईक यांना कोणत्याही परिस्थितीत युती नको आहे. या महापालिकेतील १११ जागांपैकी ९० टक्क्यांपेक्षा अधिक जागांवर नाईक आणि शिंदे यांच्या समर्थकांमध्ये सरळसरळ सामना आहे. असे असताना युती करून भाजपचे नुकसान होईल हे नाईक महाराष्ट्रातील पक्षाच्या नेत्यांना पटवून देण्यात यशस्वी ठरल्याचे बोलले जाते. कल्याण-डोंबिवलीत रविवारी दिवसभर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षातील आठ माजी नगरसेवकांना भाजपमध्ये आणले. त्यापैकी दीपेश म्हात्रे हे जरी ठाकरे यांच्यासोबत असले तरी ते एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र डाॅ.श्रीकांत यांचे कडवे समर्थक म्हणून ओळखले जात. त्यामुळे दीपेश यांना पक्षात घेत चव्हाण यांनीही कल्याण डोंबिवलीत युती नको असाच संदेश देण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.

एकनाथ शिंदेची भिस्त दिल्लीश्वरांवर ?

या परिस्थितीतही एकनाथ शिंदे यांनी अजूनही संयमाची भूमिका घेतलेली दिसते. शिवसेनेत उभी फूट पडल्यापासून शिंदे भाजपच्या दिल्लीतील नेत्यांशी जवळीक साधून आहेत. अमित शहा यांना शिंदे वरचेवर भेटतात, त्यांचे सल्ले घेतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिंदे यांना युती हवीच आहे असे त्यांच्या निकटवर्तीय गोटातून सांगितले जाते. ठाण्यातही शिंदे यांनी भाजपच्या माजी नगरसेवकांना फारसे अंतर दिलेले नाही. युती झाली नाही तर मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय या दोन पक्षांपुढे असणार आहे. मात्र निवडणुकीच्या राजकारणात मैत्रीपूर्ण असे फार काही नसते याची जाणीव शिंदे यांनाही आहे. त्यामुळे ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवलीतील माजी नगरसेवकांना आपल्या पक्षात घेण्याच्या स्पर्धेत शिंदे सुरुवातीपासून उतल्याचे पाहायला मिळते. नवी मुंबईत गणेश नाईक यांच्याकडे जवळपास प्रत्येक प्रभागात निवडणुकीत उतरू शकतील अशा पदाधिकारी, कार्यकर्त्यांची फळी आहे. त्यामुळे परपक्षातील इच्छुकांवर गळ टाकण्याची घाई नाईक यांनी अजून तरी दाखवलेली नाही. कल्याण- डोंबिवलीत मात्र या स्पर्धेत रवींद्र चव्हाण यांनी शिंदे यांच्यावर सध्या सरशी साधल्याचे दिसते. उद्या युती झालीच तर जागांच्या वाटाघाटीत माजी नगरसेवकांची ही फळी कामाला येईल याची जाणीव दोन्हीकडील नेत्यांना दिसते. त्यामुळे घाऊक पक्ष भरतीची ही स्पर्धा जोरात रंगली आहे. नवी मुंबईत युती झाली तरी शिंदे यांच्याकडे ४५ माजी नगरसेवकांची कुमक आता आहे. १११ जागांपैकी या जागांवर पहिल्या टप्प्यातच शिंदे दावा करू शकतात. अर्थात नाईक यांना हे मान्य नाही. नवी मुंबईत दोन हात होऊनच जाऊ द्या या पवित्र्यात नाईक आहेत. अर्थात प्रत्यक्ष निवडणुकीच्या धामधुमीत शिंदे यांना दिल्लीतील महाशक्तीचा पाठिंबा मिळतो का यावरच त्यांच्या ठाणे जिल्ह्यातील राजकारणाची दिशा ठरेल हे स्पष्ट आहे.