ठाणे : ठाणे शहरात सण-उत्सव, नेत्यांचे वाढदिवस, समारंभासाठी ठिकठिकाणी बॅनर उभारले गेले आहे. या बॅनरमुळे शहर विद्रुप झाले असून नुकतेच बॅनवर कारवाईसाठी गेलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्याला एका वाहनाची धडक बसली. ही घटना ठाणे महापालिका आयुक्तांच्या घोडबंदर येथील निवासस्थानाजवळ घडली. या घटनेत संबंधित कर्मचारी जखमी झाला असून अपघाताची नोंद कासारवडवली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
ठाणे शहरात गेल्याकाही वर्षामध्ये मोठ्याप्रमाणात बेकायदा फलक उभारले जात आहेत. यामध्ये राजकीय पक्षाच्या नेत्यांचा, पदाधिकाऱ्यांचा सामावेश अधिक असतो. दिवाळी निमित्ताने अनेक पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ठाणेकरांना दिवाळी निमित्ताने शुभेच्छांचे बेकायदा बॅनर चौका-चौकात, पदपथालगत उभारले आहेत. काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लागण्याची शक्यता असल्याने या बॅनरमध्ये पूर्वीच्या तुलनेत आणखी वाढ झाली आहे. दिवाळीनंतर हे बॅनर काढणे अपेक्षित होते. अद्यापही महापालिकेने या बॅनरवर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे ठाणे, माजिवडा, घोडबंदर, वागळे इस्टेट, वर्तकनगर भागात मोठ्याप्रमाणात फलक उभारण्यात आले आहेत. नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. या बॅनरमुळे शहर देखील बकालावस्थेत दिसत आहे. या बॅनरवर कारवाई का केली जात नाही असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. राजकीय नेत्यांचे सर्वाधिक बॅनर आहेत. मेट्रोच्या खांबवर देखील हे बॅनर लटकताना दिसतात.
कारवाईसाठी गेलेला कर्मचारी जखमी
घोडबंदर येथील हिरानंदानी इस्टेट भागात ठाणे महापालिका आयुक्तांचे निवासस्थान आहे. या भागात विद्युत खांबावर अनधिकृतपणे बॅनर उभारण्यात आले होते. २८ ऑक्टोबरला दुपारी ४ वाजता महापालिकेचे कर्मचारी अब्दुल मुलानी (५०) हे येथील बॅनर काढत होते. त्याचवेळी एका भरधाव वाहनाने त्यांना मागून धडक दिली. यात त्यांच्या कमरेला, डोक्याला, दोन्ही हाताला, पायाला गंभीर दुखापत झाली. या अपघातानंतर वाहन चालकाने वाहन थांबविण्याऐवजी तेथून पळ काढला. आयुक्तांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकांना ही घटना दिसल्यानंतर त्यांनी तात्काळ मुलानी यांना मानपाडा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर उपाचार झाल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी कासारवडवली पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे कासारवडवली पोलीस ठाण्यात मोटरवाहन अधिनियम, १९८८ चे कलम १३४ (अ), १३४ (ब), १८४ आणि भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ चे कलम १२५ (अ) आणि २८१ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
