विकासकामे आणि सुशोभीकरणाच्या नावाखाली लूट होत असल्याचा भाजपचा आरोप

ठाणे : शहरात विकासकामे आणि सुशोभीकरणाच्या नावाखाली ठाणे महापालिकेच्या तिजोरीची लूट होत असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी करत त्यासबंधीचे पुरावे आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे सादर केले आहेत. याप्रकरणी संबंधित अधिकारी आणि ठेकदारांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली असून यामुळे संबंधित अधिकारी आणि ठेकदार चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.

भाजप आमदार संजय केळकर यांनी मंगळवारी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. या दरम्यान त्यांनी ठाणे शहरात विविध माध्यमांतून सुरू असलेली कोट्यवधींची विकास कामे अर्धवट आणि दर्जाहीन असतानाही कंत्राटदारांना देयके अदा करण्यात आल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी काही कामांचे पुरावेही सादर केले. या प्रकरणांमध्ये संगनमत असलेल्या अधिकारी आणि कंत्राटदारांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी आयुक्तांकडे केली. दरम्यान, ठाणेकरांच्या या तिजोरीचे रखवालदार म्हणून भूमिका बजावत प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशाराही त्यांनी दिला.

हेही वाचा >>> “भाजपाचे हिंदुत्व ढोंगी”; राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण यांची टीका

कोपरी येथे एक कोटी रुपये खर्चून जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आला. हे काम अर्धवट असून दर्जाहीन असतानाही कंत्राटदाराला कामाचे पैसे अदा करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. २६ तलावांच्या दुरुस्ती आणि सुशोभिकरणासाठी १८६ कोटींची तरतूद करण्यात आली होती. केवळ विकासाच्या नावाखाली यात कोट्यवधींची लूट होत होती. याबाबत हरकत घेतल्यानंतर आता १५ तलावांसाठी ६० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. भाजप विकास कामांच्या विरोधात नसून विकासकामांच्या नावाखाली होणाऱ्या लुटी विरोधात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> ठाणे जिल्ह्यातील १६ अनाथ चिमुकल्यांना मिळाले पालक

उथळसर येथील जोगीला तलावासाठी या आधीच साडेतीन कोटींचा खर्च करण्यात आला आहे. एवढा खर्च करूनही येथील काम अर्धवट आहे. तरीही दुसऱ्या टप्प्यात या तलावासाठी नव्याने तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील पदपथांच्या कामातूनही ठेकेदार लूट करीत असून त्याच-त्याच पदपथांवर पुन्हा काम करण्यात आली आहेत. या कामांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.  भाजप ठाणेकरांच्या प्रत्येक पैशाचा हिशोब घेणार असून प्रसंगी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘श्रीरंग’च्या रहिवाशांच्या सूचना स्वीकारणार

‘श्रीरंग’च्या रस्तारुंदीकरणाबाबत आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेतली असल्याचे केळकर म्हणाले. हा रस्ता रुंद करताना रहिवाशांना त्रास होणार नाही. हे काम करण्यापूर्वी रहिवाशांच्या सूचना आणि हरकतींचा विचार केला जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचे केळकर यांनी सांगितले.