ठाणे – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर ठाण्यात पक्ष प्रवेशाची मालिका सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे विक्रम खामकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला असतानाच, बुधवारी आणखी एका सहकाऱ्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का बसला आहे.

ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. उपमुख्यमंत्री पवार यांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या सुहास देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नजिब मुल्ला आणि आनंद परांजपे उपस्थित होते.

‘मी नेहमीच सर्वांना सांगत असतो, समाजकारण आणि राजकारण करत असताना जातीचा पातीचा, नात्याचा -गोत्याचा विचार करायचा नसतो. ज्यावेळेस आपण शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेतो, त्यावेळेस आपली कृती देखील तशी असली पाहिजे. सगळ्यांनी त्याबद्दल दखल घेतली पाहिजे’, असे मत यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडले. ते पुढे म्हणाले, सुहास देसाई यांनी आपल्या पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे कुठेही कसलाही भेदभाव होणार नाही याची काळजी आनंद परांजपे आणि नजिब मुल्ला यांनी घेतली पाहिजे अशा सूचना अजित पवार यांनी यावेळी दिल्या. या पक्ष प्रवेशाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे पदाधिकरारी आणि कार्येकर्ते उपस्थित होते.

रात्री आव्हाडांसोबत आणि सकाळी अजित पवार पक्षात प्रवेश..

सुहास देसाई हे काल रात्री जितेंद्र आव्हाड यांच्या सोबत पाचपाखाडी येथील तुळजाभवानी मंदिरात झालेल्या महाआरतीला उपस्थित होते. आणि आज सकाळी त्यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यामुळे सर्वांच्या भुवय्या उंचवल्या असून जितेंद्र आव्हाडांना आणखी एक धक्का बसल्याचे म्हटले जात आहे.