ठाणे : पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्यासाठी भारतीय सैन्याने राबवलेल्या ऑपरेशन ” सिंदुरचे ” सर्वच स्तरातून स्वागत होत विविध ठिकाणी यात्रा काढून, फलक लावून सर्व भारतीय जवानांचे अभिनंदन करण्यात येत आहे. या महत्त्वपूर्ण लष्करी मोहिमेत भारतीय जवानांनी दाखवलेल्या शौर्य आणि तत्परतेचे देशभरात कौतुक होत असतानाच आता त्यांच्या योगदानाची दखल घेत मध्ये रेल्वेच्या विविध रेल्वे स्थानकांवर खास चित्रफिती लावून जवानांना सलामी दिली जात आहे.
देशभक्तीपर संगीत, युद्धाचे क्षण अशी सांगड असलेल्या या चित्रफिती पाहण्यासाठी प्रवाशी देखील आवर्जून रेल्वे स्थानकांवर थांबत आहे. याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाच्या एक्स या समाजमाध्यमांवरून माहिती देखील देण्यात आली आहे.
पहलगाम येथील दहशतवादी हल्यात सर्वसामान्य पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारतीय सैन्याकडून ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान मधील दहशतवादी अड्डे उध्वस्त करण्यात आले. मात्र यानंतर पाकिस्तानकडून भारतीय सीमारेषेवर हल्ले चढविण्यात आले. याला भारतीय सैन्याकडून चोख प्रतिउत्तर देण्यात आले. सैन्याच्या याच शौर्यपूर्ण कामगिरीबद्दल संपूर्ण देशवासियांकडून भारतीय जवानांचे अभिनंदन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मागील दोन दिवसांपासून विविध राजकीय पक्षांकडून तिरंगा रॅली काढून जवानांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
यातच आता मध्य रेल्वे प्रशासनाकडून देखील भारतीय जवानांना सलामी देण्यासाठी विविध चित्रफीत रेल्वे स्थानकांवर दाखवण्यात येत आहे. अनेकदा विविध उत्पादनांच्या जाहिराती दिसत असलेल्या मोठया टीव्ही स्क्रीन वर ऑपरेशन सिंदुरची झलक पाहायला मिळाल्याने प्रवाशांनी देखील आवर्जून ही चित्रफीत पहिली. या उपक्रमाअंतर्गत, स्थानकांवर लावण्यात आलेल्या या चित्रफितींतून ऑपरेशन सिंदूरच्या यशोगाथा, जवानांचे पराक्रम आणि देशसेवेचे संदेश दाखवले गेले. प्रवाशांमध्येही या गोष्टींबाबत औत्सुक्य निर्माण झाले असून अनेकांनी या उपक्रमाचे स्वागत केले.