ठाणे : ठाण्यातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित अशी ओळख असलेल्या नौपाड्यातील सरस्वती विद्या मंदिर ट्रस्टच्या शाळेतील मराठी माध्यम बंद होऊन इंग्रजी माध्यम सुरू होणार असल्याचा संदेश समाजमाध्यमांवर शनिवारी प्रसारित होताच पालकांनी शाळेबाहेर गर्दी केली. मनसेच्या नेत्यांनीही धाव घेऊन प्रशासनाला जाब विचारला. दरम्यान, मराठी माध्यमाची शाळा बंद होणार नसल्याचे स्पष्टीकरण शाळा प्रशासनाने दिल्यानंतर हि केवळ अफवा असल्याचे उघड झाले.

ठाण्याच्या नौपाडा भागात सरस्वती मंदिर ट्रस्टची मराठी माध्यमाची शाळा आहे. गेल्या काही वर्षात पालकांचा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे ओढा वाढला आहे. यातून शहरातील मराठी माध्यमांच्या अनेक शाळा बंद झाल्या असून त्यांचे रुपांतर इंग्रजी माध्यमांच्या शाळेत करण्यात आले आहे. असे असले तरी अशा परिस्थितीतही सरस्वती मंदिर ट्रस्टची मराठी माध्यमाची शाळा आजही आपले स्थान टिकवून आहे. मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये नौपाडय़ातील सरस्वती विद्यामंदिर शाळेला विशेष ओळख आहे.

आपल्या पाल्याला मराठी माध्यमातून शिक्षण देण्याची इच्छा असलेल्या पालकांचा या शाळेकडे ओढा असतो. ठाण्यातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित अशी शाळेची ओळख आहे. या शाळेतील मराठी माध्यम बंद होऊन इंग्रजी माध्यम सुरू होणार असल्याचा संदेश समाजमाध्यमांवर शनिवारी प्रसारित झाला. या संदेशानंतर पालक शाळेबाहेर जमू लागले आणि यामुळे काही वेळातच शाळेबाहेर पालकांची मोठी गर्दी झाली.

संदेशाबाबत माहिती घेण्यासाठी पालक प्रशासनाला भेटण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, त्यांना शाळेच्या प्रवेशद्वारावरच रोखण्यात आले होते. त्यांच्यातील संभ्रम आणखी वाढला. दरम्यान, याबाबत माहिती मिळताच मनसेचे नेते अविनाश जाधव, ठाणे शहर प्रमुख रविंद्र मोरे यांनीही शाळेत धाव घेतली. यानंतर मनसेच्या शिष्टमंडळाने प्रशासनाची भेट घेऊन प्रशासनाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला.

मनसेचा मोर्चा काढण्याचा इशारा

नौपाड्यातील सरस्वती विद्या मंदिर ट्रस्टच्या शाळेने नवीन इमारतीचे बांधकाम केले. त्यासाठी आजी-माजी विद्यार्थांनी निधी दिला. या नवीन इमारतीत सीबीएससी माध्यमाची शाळा सुरू करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू आहेत. त्यास पालकांचा विरोध आहे. या मराठी माध्यमाच्या शाळेत ११०० विद्यार्थी शिकत आहेत. शाळा प्रशासन मराठी माध्यम बंद करणार असेल तर, त्यांच्या पालकांना घेऊन मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला.

शाळा प्रशासनाचे म्हणणे

सरस्वती विद्या मंदिर ट्रस्टने आठ वर्षांपुर्वी इंग्रजी माध्यमाची शाळाही सुरू केली आहे. त्याला मान्यता प्राप्त व्हावी यासाठी पाठपुरावा सुरू असून त्याकरिता दिल्लीहून एक पथक शाळेत तपासणीसाठी आले होते. या तपासणी कामामुळे मुलांचे कमीतकमी शैक्षणिक नुकसान व्हावे, यासाठी महिना अखेरीची सुट्टी शनिवारी देण्यात आली. सोमवारपासून नियमित शाळा सुरू असणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मराठी माध्यमाची शाळा बंद होणार असल्याचा संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित झाला आणि पालकांमध्ये शाळा बंद होणार असल्याचा गैरसमज निर्माण झाला. मराठी माध्यमाची शाळा बंद करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसून मराठी माध्यमाची शाळा हा आमचा अभिमान आहे, असे सरस्वती मंदिर ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त सुरेंद्र दिघे यांनी सांगितले.